सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मात्र सध्या सोलापूरमधील एका विद्यार्थाच्या उत्तरपत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. बारावीतील विद्यार्थ्याने पहिल्या पानावर ‘एक मराठा कोटी मराठा’ लिहून उत्तर लिहिण्यास सुरुवात केली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटील घराघरात पोहोचले आहेत.
अगदी लहान मुलांमध्ये देखील जरांगे पाटील यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. यातच आता बारावीच्या विद्यार्थाने सहामाहीचा पेपर सोडविताना चक्क एक मराठा कोटी मराठा अशी लिहून सुरुवात केल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
उत्तर सोलापूरमधील बीबी दारफळ येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्यालयामधील ही घटना आहे. संकेत लक्ष्मण साखरे असे या मुलाचे नाव आहे. संकेत साखरे याचा 2 नोव्हेंबर रोजी राज्यशास्त्राचा पेपर होता. पेपर लिहिण्यास सुरुवात करण्याअगोदर संकेतने एक मराठा कोटी मराठा असे लिहून सुरुवात केली आहे. त्यासोबत जय जिजाऊ ,जय शिवराय,असेही मजकूर लिहिले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन केली जात आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झाले होते.