पुणे – ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (ए.आय.एस.एस.एम.एस.) पॉलिटेक्निक महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, ऑटोमोबाइल विभाग व आयएसटीइ पुणे फॅकल्टी चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने “आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन इंजिनिअरिंग ” या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डेटा सायन्स फॉर क्वालिस सिक्युरिटीचे वरिष्ठ अभियांत्रिकी व्यवस्थापक अमील मुकेरी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.के.गिराम यांनी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट केले. अमीर मुकेरी यांनी सहभागींना विविध डोमेन्समध्ये एआय आणि त्याच्या अनुप्रयोगांचे महत्व सांगितले.
कार्यशाळेचे साधन व्यक्ति म्हणून सुमागो इन्फोटेक प्रा. लि. नाशिकचे चीफ ग्रोथ ऑफिसर सुधीर गोराडे, लर्निंग अँड डेव्हलपमेंट हेड अमोल पवार, सीईओ सोनाली गोराडे, प्रसाद पवार, सीनियर प्रोजेक्टर मॅनेजर प्रसाद पवार या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या निरोप समारंभासाठी प्रमुख पाहुण म्हणून आरबीटीईच्या टेक्निकल विभागाचे उपसचिव मोहम्मद शाहिद उस्मानी, एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ.अभिजित मंचरकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेत एकूण 180 प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत एआय आणि इंडस्ट्री, डेटा सिक्युरिटी व प्रायव्हसी, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि आयओटी अशा महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा झाली.
प्राचार्य प्रा. एस के गिराम व इ. अँड टी.सी. विभाग प्रमुख प्रा. वर्षा गायकवाड, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.अंजली खंडागळे, ऑटोमोबाइल विभाग प्रमुख प्रा.जी.एम.नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे समन्वय डॉ.अर्चना उबाळे, प्रा.रूपाली निलाजगी, प्रा.के.डी.वीर यांनी केले.