पुणे – करोना संसर्गानंतर देशातील बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्याही कमी झाल्यामुळे तरुण आता सरकारी नोकरीकडे वळले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त 214 शिपाई पदासाठीची मंगळवारी (दि.5) लेखी परिक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ३९ हजारहून अधिक अर्ज आले आहेत.
या परीक्षेसाठी 79 परिक्षा केंद्रावर तब्बल पावणेतीन हजार पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला येणार आहे. त्याशिवाय परीक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व तयारी झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
शिपाई पदाच्या भरतीसाठी २०१९ मध्येच जाहिरात देण्यात आली होती. मात्र करोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा लाबविण्यात आली. आता या पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार २१४ पदांसाठी ३९ हजार ३२३ तरुणांनी अर्ज केला आहे.
पोलिसांकडून उमेदवारांसाठी सूचना
– परीक्षेच्या वेळेत मोबाईसह इतर इलेट्रॉनिक उपकरणे बाहेर ठेवावी लागणार
– कोवीडच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक
– परिक्षेची वेळ संपल्यानंतर पर्यवेक्षकाच्या सूचनेनंतर जागा सोडावी.
– हॉल तिकीटसह आधार, पॅन, लायसन्स, पासपोर्ट जवळ बाळगा
– उमेदवारांनी निळे, काळे बॉलपेन वापरावे
– परीक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्र पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागणार
असे करा हॉल तिकीट डाऊनलोड
परीक्षार्थी उमेदवरांना इमेलवर हॉल तिकीटची लिंक पाठवली जाणार आहे. काही अडचण आल्यास 9699792230, 8999783728, 020-26122880 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने कले आहे.