नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी व्यक्त केलेल्या काही मतांवरून आता हे स्थगित झालेले आंदोलन पुन्हा एकदा चिघळणार असल्याचे दिसत आहे. येत्या गुरुवारी याबाबत मोठी घोषणा करू, असा इशारा स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने दिला आहे.
येत्या गुरुवारी ब्रिजभूषण यांच्याबाबतची पोलीस चौकशी पूर्ण होणार असून, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही स्थगित केले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही स्थगिती केल्याचे विनेशने सांगितले.
मात्र, त्याचवेळी चर्चा सुरू असताना ठाकूर बराच वेळ मोबाईलवरच बोलत होते. त्यांच्याशी जितका वेळ चर्चा होणे गरजेचे होते तेवढा वेळच मिळाला नाही. त्यांनी केवळ तुमच्यावर अन्याय होणार नाही, मात्र पोलीस चौकशीचा अहवाल येईपर्यंत आंदोलन स्थगित करा, असे आवाहन केले, ते आम्ही मान्य केले, असे विनेशने सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही हेच घडले. त्यांच्या बहुतांशी वेळा अनेकांचे त्यांना फोनच येत होते. ते इतक्या मोठ्या पदावर असल्याने हे होणार, हे आम्हालाही अपेक्षित होते. मात्र ठाकूर यांनी पूर्ण वेळ आमच्याशीच चर्चा करणे गरजेचे होते.
असो, आता त्यावर बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा गुरुवारी काय होते ते आमच्यासाठीच नव्हे तर देशासाठी खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या चौकशीतून जे काही बाहेर येईल ते पाहिल्यावरच आंदोलनाची दिशा व व्याप्ती निश्चित केली जाणार आहे, असेही विनेशने सांगितले.
30 जूनपर्यंत निवडणुका अशक्य
जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाला येत्या 30 जूनपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक केले आहे. मात्र, निवडणुका घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते व त्यासाठी 21 दिवसांची नोटीस आधीच द्यावी लागते. आता महासंघाकडे तेवढा वेळ हाती नाही, म्हणूनच 4 जुलै किंवा त्यानंतरच्या एक-दोन दिवसांत निवडणुका घेतल्या जातील, असेही आता भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून सांगण्यात येत आहे.
कोणतीही टाळाटाळ नाही
संघटनेशी संलग्न 25 राज्य संघटना आहेत. त्यांचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करतात. त्यामुळे त्यांना वेळेत नोटीस मिळणे व त्यांना येथे दाखल होणे शक्य व्हावे यासाठीच संघटनेने सुरुवातीला 4 जुलै हा दिवस निश्चित केला होता. आम्ही आमच्याकडून कोणतीही टाळाटाळ करत नसल्याचा खुलासाही संघटनेने केला आहे.