टोकियो – भारताचा उदयोन्मुख कुस्तीपटू दीपक पुनियाला उपांत्य फेरीत चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले व त्याने सुवर्ण किंवा रजतपदकाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र, त्याला अमेरिकेच्या डेव्हिड टेलरकडून पराभव पत्करावा लागला.
फ्रीस्टाइल प्रकारातील 86 किलो वजनी गटात जरी त्याचा पराभव झाला असला तरीही गुरुवारी ब्रॉंझपदक मिळवण्याची संधी त्याला मिळालेली आहे.
पुरुषांच्या 86 किलो गटात पुनियाला अवघ्या काही मिनिटांतच पराभवाचा सामना करावा लागला. टेलरने पुनियाचा तांत्रिक गुणांच्या आधारावर 10-0 असा पराभव केला.
बुधवारी सकाळी झालेल्या 86 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत पुनियाने रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात चीनच्या शेन याचा पराभव केला होता. अखेरच्या काही सेकंदांत पुनियाने चमत्कार करताना शेनचा पराभव केला व उपांत्य फेरी गाठली होती.