टोकियो – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची महिला मुष्टियुद्ध खेळाडू लोवलीना बोर्गोहेनचा उपांत्य फेरीत पराभव झाला असला तरीही तिने देशासाठी ब्रॉंझपदक मिळवत विक्रमी कामगिरी केली.
लोवलीनाकडून खरेतर सुवर्ण यशाची अपेक्षा होती. मात्र, तिला बुसेनाझच्या आक्रमक खेळापुढे ती निष्प्रभ ठरली. अर्थात त्यानंतरही तिने ब्रॉंझपदक निश्चित केले. मुष्टियुद्ध प्रकारात पदक पटकावणारी लोवलीना भारताची दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी सुपरमॉम मेरी कोमने अशी कामगिरी केली आहे.
ईशान्य भारतातून येत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी लोवलीना तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यानंतर मुष्टियुद्धात पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय खेळाडू बनली आहे.
उपांत्य फेरीत लोवलीनाची लढत जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीशी होती. ही लढत जिंकल्यावर ऑलिम्पिकच्या कोणत्याही वजनी गटाची अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली महिला मुष्टियोद्धा बनण्याची संधी लोवलीनाला होती. मात्र, बुसेनाझच्या डावपेचांसमोर तिच्या आव्हानातील हवाच निघून गेली व तिला पराभवाचा सामना करावा लागला.
2019 सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बुसेनाझने लोवलीनाचाच पराभव करत सुवर्णपदक पटकावले होते, तर लोवलीनाला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले होते.