माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अक्षय कुमारबरोबर “पृथ्वीराज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ही बाब आता सगळ्यांना माहिती झाली आहे. तिच्या या पहिल्या वहिल्या सिनेमापूर्वी “पृथ्वीराज’च्या सेटवर एक पूजा करण्यात आली होती.
त्यावेळी मानुषी, अक्षय आणि “पृथ्वीराज’च्या सेटवरील सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ जण उपस्थित होते. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदींबरोबर मानुषी या पूजेला बसली होती. मुख्य म्हणजे राणी मुखर्जीही यावेळी आवर्जुन उपस्थित होती. तिनेही या धार्मिक कार्यात भाग घेतला होता. या पूजेचा व्हिडीओ अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“पृथ्वीराज यांच्या विश्वामध्ये पाऊल टाकत असताना.’ अशी कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिली आहे. संपूर्ण देशासाठी स्वाभीमानाचे आदर्श ठरावेत, अशा पृथ्वीराज चौहान यांचा रोल मिळणे आपले सौभाग्य असल्याचे अक्षयने म्हटले आहे.
हा सिनेमा पुढच्यावर्षी दिवाळीमध्ये रिलीज होतो आहे, अशी माहितीही अक्षयने दिली आहे आणि फॅन्सच्या शुभेच्छांची अपेक्षाही केली आहे. “पृथ्वीराज’मध्ये महाराजा पृथ्वीराज चौहानची पत्नी संयोगिताच्या रोलमध्ये मानुषी दिसणार आहे.