पारगाव -दौड तालुक्यातील नानगाव येथे करोनाचा प्रभाव कमी होत असतानाच डेंग्यूसदृश्य आजाराने अनेकजण आजारी पडले आहेत. ताप, अंगदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून येत आहेत. नानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. टी. आर. बनसोडे यांनी काही रुग्णाचे रक्ताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते.
यातील चार जणांचे रिपोर्ट हे चिकणगुनियाचे निष्पन्न झाले आहेत. इतर रुग्णाची तपासणी सुरू आहे. नानगाव ग्रामपंचायतीला पाणी साठवण ठिकाण, किंवा डास उत्पत्तीची ठिकाणावर औषध फवारणी करण्यास सांगितले आहे.
नानगावमध्ये शंभरावर रुग्ण असल्याचे दौड तालुका राष्ट्रवादी युवतीच्या कार्यध्यक्षा आश्लेषा शेलार यांनी सांगितले. उपसरपंच संदीप खळदकर म्हणाले की, गावात औषध फवारणी सुरू असून आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळला जाणार आहे.