जयपूर: गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपमधील अंतर्गत वाद चांगलाच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी सचिन पायलट लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए.पी.अब्दुल्लाकट्टी भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या प्रदेश कार्यसमितीच्या एका बैठकीला उपस्थित होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सचिन पायलट चांगले नेते आहेत. आगामी काळात लवकरच सचिन पायलट काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे पाहायला मिळत असून, सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, तो प्लान यशस्वी झाला नाही.
काँग्रेसने त्यावेळी वेळ मारून नेली. यानंतर भाजप नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. यावर, बहुगुणा यांनी सचिन तेंडुलकरसोबत चर्चा केली असेल. माझ्यासोबत चर्चा झालेली नाही, असे म्हणत सचिन पायलट यांनी टोला लगावला होता.
दरम्यान, सचिन पायलट यांनी गेल्या ६ महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास ६६ वेळा वाढल्या आहेत, असे म्हणत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यावर सर्वच गोष्टी महाग होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर होतो आहे. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत, अशा शब्दांत पायलट यांनी टीकास्त्र सोडले होते.