श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून निषेध

कोलंबो – श्रीलंकेत आज झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा जगभरातून निषेध होत आहे. ईस्टरच्या दिवशी झालेल्या या बॉम्बस्फोटांमागील सूत्रधारांचा विविध देशांच्या प्रमुखांसह ख्रिश्‍चन धर्मियांच्या वरिष्ठ धर्मगुरुंनीही कडक शब्दात निर्भत्सना केली आहे.

जगभर प्रेम पसरवण्याच्या दिवशी द्वेषभावना का पसरवली गेली ? असा उद्विग्न सवाल पॅरिसचे आर्चबिशप मायकेल ऑपेतित यांनी विचारला आहे. तर न्यूझिलंडचे पंतप्रधान जॅसिन्डा आर्डेम यांनीही या भीषण हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपल्या संदेशामध्ये आर्डेम यांनी 15 मार्च रोजी न्यूझिलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात दोन मशिदींवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचाही संदर्भ दिला आहे. या हल्ल्यामध्ये 51 जण मरण पावले होते. अशा हल्ल्यामुळे न्यूझिलंड दहशतवादाविरोधात अधिक सक्षम झाला असल्याचे आर्डेम यांनी म्हटले आहे.

जर्मनीचे अध्यक्ष फ्रॅंक वॉल्टर स्टेन्मीयर यांनीही श्रीलंकेच्या अध्यक्षांना उद्देशून दिलेल्या संदेशामध्ये या भ्याड हल्ल्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. युरोपियन संघाचे कार्यकारी अधिकारी जिएन जंकर यांनी या बॉम्ब हल्ल्याचा उल्लेख धक्कादायक आणि दुःखदायक असल्याचे म्हटले आहे.

आखाती देशांमधील बहारीन, कतार आणि संयुक्‍त अरब अमिरातीनेही विदेश मंत्रालयांच्याद्वारे निवेदन जाहीर करून या हल्ल्याचा निषेध केला आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा बॉम्बहल्ला खरोखरच भयानक असल्याचे म्हटले आहे. तसेच या हल्ल्यातील मृतांप्रती सहवेदना व्यक्‍त करताना अशा प्रसंगी सर्वांना एकता अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणालही आपल्या धर्माचे आचरण करताना भय वाटता कामा नये, असेही त्या म्हणाल्या.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी श्रीलंकेवरील हल्ला क्रूर आणि मन खिन्न करणारा असल्याचे म्हटले आहे. तर तुर्कीचे अध्यक्ष रिसेप इर्डोगन यांनी ईस्टरच्या दिवशी झालेल्या या हल्ल्यामुळे मानवत्येचा अवमान झाल्याची भावना व्यक्‍त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.