दखल: जंगलातील मानवी अतिक्रमण घातक

विठ्ठल वळसेपाटील

12 एप्रिल 2019 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 2 वर्षांच्या वाघिणीचा तार सापळ्यात अडकून मृत्यू झाला तसेच 5 नोव्हेंबर 2018 ला यवतमाळमधील 13 जणांचा बळी घेणारी नरभक्षक ठरलेली अवनी ही वाघीणही अखेर संपली. तिच्या पश्‍चात 11 महिन्यांचे दोन बछडे होते. ते अद्याप शिकार करण्यास योग्य झाले नव्हते. 9 डिसेंबर 2018 ला चंद्रपूर जिल्ह्यातील भामडेळी गावात विद्युत प्रवाहाच्या धक्‍क्‍याने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 3 वर्षांच्या वाघाचा शेताच्या कुंपणात सोडलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं मुख्य प्रवेशद्वार जवळ मोहरली गेटजवळ भामडेळी हे गाव आहे. अवनीच्या मरणानंतर तिच्याबद्दल त्या गावकऱ्यांनी सुटकेचा श्‍वास टाकला. परंतु सोशल मीडिया, विरोधक व निसर्गप्रेमींनी अवनी व बछड्यांबाबत मात्र शोक व्यक्त केला व शासनाला टीकेचे धनी केले. परंतु हे जंगली प्राणी जंगल सोडून बाहेर का येऊ लागले, त्यांच्या हक्‍कांवर गदा कोणी आणली? त्यांच्या अधिवासावर केलेले अतिक्रमण या हस्तक्षेपामुळे वन्यजीव नाहीसे होऊ लागले आहेत याची जाणीव झाली पाहिजे. सध्या बिबट्या मानवी वस्तीकडे आपले मोर्चे वळवू लागले आहेत. मागील महिन्यात 24 मार्च 2019 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यात साकोरी गावात बिबट्याने 5 वर्षांच्या मुलीवर हल्ला करून ठार केले. भविष्यात वाघ व बिबटे मानवी शिकार करताना दिसतील. उजाड जंगले व मानवी हस्तक्षेप घातक ठरणार हे सत्य नाकारता येणार नाही.

वन्यप्राण्यांबाबत भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोठी उदासीनता होती. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन्यजीव कायदा 1972 साली अस्तित्वात आला तर, सन 1973 साली व्याघ्र प्रकल्प रचना हाती घेतली तोपर्यंत उशीरच झाला होता. 1972 साली महाराष्ट्र व देशात पडलेला दुष्काळ हा एक वन्यजीवांसाठी मारक ठरला. या दुष्काळात मानवी जीवनाबरोबर वन्य जिवांचे अस्तित्व पणाला लागले होते. जंगले, डोंगर, दऱ्या, अभयारण्य यातून अनेक झाडे, झुडपे जळून गेली. अनेक सरपटणारे प्राणी व शाकाहारी प्राणी नाहीसे झाले.

जंगलातील पाण्याचे झरे हळूहळू नष्ट होत गेले. जंगलातील हरित दुवेच नष्ट झाले आणि त्याठिकाणी आली विदेशी झाडे. या झाडांवर ना पक्षी बसत ना पशू आश्रयाला येत. या विदेशी झाडांना ना फूल येतं ना फळे लगडतात, जरी फळे असली तरी ती फळे माकड व पक्षी खात नाहीत. अशा झाडांवर आपला अधिवासही करत नाही. या विदेशी झाडांपायी हक्‍काचे अन्न गेले. 33 टक्‍के वनआच्छादनाच्या नावाखाली रेनट्री नावाची झाडे भरमसाठ प्रमाणात लावली गेली. पावसाळाही कमी होत गेला आणि हळूहळू वन्यप्राण्यांचा कल मानवी वस्तीकडे येऊ लागला.

रानससे, रानडुक्‍कर, हरीण तसेच पक्षी, सरपटणारे प्राणी, शेखरू, खार, घोरपड यांची शिकार थांबली नाही. त्यामुळे वाघ, बिबट्या व लांडगे मानवी वस्तीकडे येत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात शेती बागायती पट्ट्यात बिबट्या दिसत आहे. त्यास पकडण्यासाठी पिंजरे लावले जात आहेत. या प्राण्यांच्या हक्‍काचे अन्न न मिळाल्याने जंगली प्राण्यांचे अतिक्रमण मानवी वस्तीकडे झाले. तसेच मानवाने केलेल्या अतिक्रमणातून जंगल हद्दीत मोठमोठे उद्योग, व्यवसाय उभे राहिले. अफाट जंगलतोड, पाणथळीच्या जागी जलतरण तलाव व हॉटेल व्यवसाय उभे केले तर, काही ठिकाणी औद्योगिक क्षेत्रे उभी केली. जंगलात वाढत गेलेला मानवी हस्तक्षेप तसेच मानवी अतिक्रमण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. केवळ पर्यावरण संतुलनाच्या गप्पा मारण्यात काही अर्थ उरत नाही.

आज देशात एकूण 50 व्याघ्र प्रकल्प असून, टायगर नेट डॉट या संस्थेने केलेल्या आकडेवारीत 2009 ते फेब्रुवारी 2018 या काळात 650 वाघांचा मृत्यू झाला आहे. यातील 475 वाघ हे व्याघ्रप्रकल्प हद्दीत आहेत. बाकीचे शिकार व अपघातात मृत्युमुखी पडले. अनेक संस्थांकडून वाघांच्या मृत्यूबाबत वेगवेगळी आकडेवारी मिळत असली तरी भारतात सर्वात जास्त म्हणजे 2226 इतकी वाघ संख्या आहे. 2015 मध्ये जेव्हा वाघांच्या वाढलेल्या संख्येबद्दल केंद्र सरकारने आपली पाठ थोपटून घेतली होती. त्यानंतर मात्र सरकारचे भरीव काम दिसून येत नाही. वाघाची कातडी व अवयवातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याने त्यांची तस्करी केली जात आहे.

आकडेवारी कमी जास्त असली तरी वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या जीवावर संकट बेतले जात आहे. तर काही वन्यजीव नष्ट झाले आहेत. व्यापाराने जंगलपट्टे व्यापत चालले आहे. सरकारने जनजागृती माध्यमातून वनक्षेत्र वाढवणे, गरजेनुसार त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदेशीर उपाय योजणे, वन्यजीवांसाठी असलेल्या विविध योजना अंमलात आणणे, जंगलातील मानवी हस्तक्षेप कायमस्वरूपी बंद करणे, जंगलतोडीवर नियंत्रण आणणे, त्यातून वाघांचे तसेच इतर वन्यप्राण्यांचे संवर्धन करता येणे शक्‍य होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.