जिनिव्हा – करोना विषाणूची लागण झाल्यामुळे जगभर मृतांचा आकडा 1 लाखांच्यापुढे गेल्यामुळे अनेक देशांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध उठवू नयेत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. हे निर्बंध वेळेपूर्वी उठवले गेल्यास करोना विषाणूचा फैलाव पुन्हा एकादा वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.
जगभरात 1.6 दशलक्ष जणांपेक्षा अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे आणि आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ 70 टक्के लोक युरोपमधील आहेत. संसर्ग आणि मृत्यूचे आकडे वाढत असतानाच अमेरिका आणि युरोपातल्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती सुधारण्याची आशा व्यक्त केली आहे. जेथे डिसेंबरमध्ये या विषाणूचा प्रथम उपद्रव सुरू झाला त्या वुहानमध्ये कित्येक महिन्यांपूर्वी लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात केली आणि या आठवड्यात चीनने तेथील लॉकडाऊनही उठवला आहे.
मला माहित आहे की काही देश आधीच मुक्कामाच्या निर्बंधामुळे हे निर्बंध उठवण्याच्या योजना आखत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधॉनॉम घेब्रेयसिस म्हणाले अन्य कोणाइतकेच “डब्ल्यूएचओ’ला देखील हे निर्बंध हटलेले पाहायचे आहेत. मात्र हे निर्बंध इतक्या लवकर उठवल्यास या रोगाचा फैलाव पुन्हा वाढायला लागेल. योग्य प्रकारे व्यवस्थापन न केल्यास निर्बंध हटवण्याचा मार्ग अधिक धोकादायक असू शकतो, असेही घेब्रेयसिस म्हणाले.
काही देशांमध्ये परिस्थिती सुधारत आहे, स्पेन, फ्रान्स आणि इटलीमध्ये रूग्णांची संख्या कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगभरातील 90 देशांना आपत्कालिन निधीपुरवठा केला असल्याचेही घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे.