नवी दिल्ली – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह भारतातील सहा जणांची नावे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2023 च्या यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समाविष्ट केली आहेत.
या यादीतील अन्य भारतीयांमध्ये टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू,उद्योगपती आकृत वैश,तन्वी रत्ना यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय असून आश्वासक राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांचा या यादीत समावेश झाल्याने त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
40 वर्षांखालील जगातील सर्वात प्रॉमिसिंग यंग ग्लोबल लीडर्सची यादी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे जाहीर केली जाते. या फोरमने म्हटले आहे की, विविध क्षेत्रातील युवा व उदयोन्मुख तरुणांची एकूणच कार्यक्षमता आणि त्यांचे कौशल्य, समाजासाठी त्यांनी केलेले कार्य आदि गुणांच्या आधारे हीं यादी तयार केली जाते.
या वर्षीच्या यादीत राजकीय नेते, नाविन्यपूर्ण उद्योजक, क्रीडा क्षेत्रात क्रांतीकारी, संशोधक आणि दूरदृष्टी ठेऊन कार्य करणाऱ्यां सुमारे शंभर जणांचा समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही संस्था 2004 मध्ये स्थापन झाली. त्यांनी आत्तापर्यंत 1400 जणांना यंग ग्लोबल लीडर्स यादीत स्थान दिले आहे.
या यादीत शिंजिनी कुंडू (फिजिशियन-सायंटिस्ट, जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटल, यूएसए), फागुन ठकरार (संस्थापक, द पर्पज मूव्ही स्टुडिओ, यूके), अली अखाई (चेअरमन, मार्टिन डाऊ लिमिटेड, पाकिस्तान), स्मृती किरुबनंदन (एंगेजमेंट डायरेक्टर, टीसीएस) वरुण शिवराम (ग्रुप वरिष्ठ उपाध्यक्ष, स्ट्रॅटेजी अँड इनोव्हेशन, ऑरस्टेड सर्व्हिसेस, यूएसए) आणि रूपा धट्ट (कार्यकारी संचालक, महिला जागतिक आरोग्य)यांचाही समावेश आहे.