कोलंबो :-भारतात येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल याने आपण एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
आशिया करंडक स्पर्धेतील सुपर फोर गटाच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत तसेच बांगलादेशविरुद्धच्या लढतीत राहुलने अफलातून यष्टीरक्षण केले. यावेळी तो तब्बल चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याचे कोणतेही दडपण त्याच्या खेळात दिसले नाही.
पाकविरुद्ध तर त्याने शतकी खेळी केली होती व त्याच सामन्यात यष्टीरक्षणही केले होते. तसेच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या लढतीतही यष्टीमागे सरस कामगिरी केली होती. त्यामुळेच आता आगामी विश्वकरंडक स्पर्धेत अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे त्याने म्हटले आहे.
दरम्यान,भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला येत्या 22 सप्टेंबरपासून पहिल्या सामन्याने सुरुवात होणार आहे. दुसरा सामना 24 तर अखेरचा सामना 27 तारखेला होणार आहे. लोकेश राहुल पूर्णपणे फीट असल्यामुळे संघात तीन यष्टीरक्षकांची गरज नसल्याने सॅमसनला संधी मिळणे अशक्य आहे.