वाचाल तर वाचाल…! जागतिक पुस्तक दिन विशेष

50 हजारांहून अधिक ग्रंथाचा समावेश असलेले जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय उभारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पियुषा अवचर

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तके आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांवरील प्रेम संपूर्ण जगाला माहिती आहे.
‘ज्ञानाचे प्रतिक’ (symbol of knowledge) म्हणून ज्यांना जगभरात ओळखले जाते त्यांच्या वाचाल तर वाचाल या विचाराने लाखोंना प्रेरणा मिळाली आहे.

जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय उभारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपल्या पुस्तकांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडू नये यासाठी बंगला बांधणारे बाबासाहेब एकमेव आहेत. बाबासाहेबांचे निवासस्थान म्हणजेच मुंबईतील दादर येथील ‘राजगृह.’ याठिकाणी बाबासाहेबांनी 50 हजारांहून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. हे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय असून यामध्ये विविध भाषांमधील ग्रंथांचा समावेश आहे. पुस्तकांसाठी घर बांधताना त्याची बांधणी कशी असावी याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यानुसारचं त्यांच्या ग्रंथालयाची बांधणी केली जेणेकरून त्यांना हवे असणारे ग्रंथ लगेच त्यांच्या हाती लागतील.

 

2004 मध्ये ज्यावेळी कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील टॉप 100 विद्वानांची यादी तयार केली त्यामध्ये पहिल्या नंबरवर जे नाव होते ते होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. यावरूनच त्यांच्या विद्वतेची आपल्याला कल्पना येऊ शकते. इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने 2011 मध्ये बाबासाहेबांवर संशोधन केले होते. त्यावेळी तब्बल 64 विषयांचा गाढा अभ्यास आणि प्रभूत्व असणारे इतिहासात असे कोणीही नव्हते.

बाबासाहेब नेहमी म्हणत तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्यातील एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगावे हे शिकवेल.

 

बाबासाहेबांना वाचनाची एवढी आवड होती की, ज्यावेळी त्यांच्याकडे पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळी ते ग्रंथालयामध्ये जाऊन ग्रंथालयाची वेळ संपेपर्यंत तिथे वाचन करत. ग्रंथालयामध्ये सर्वात पहिला प्रवेश करणारे आणि सर्वात शेवटी जाणारे एकटे बाबासाहेबच होते. जगाच्या पाठीवर असा पुस्तकप्रेमी शोधूनही सापडणे अशक्यच.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.