विरार – विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीत आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच एका रुग्णाच्या पत्नीला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय कुमार दोषी यांच्यावर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णालयाला लागलेल्या आगीत कुमार यांचा होरपळून मृत्यू झाला. कुमार यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्या पत्नी चांदणी दोषी यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.
कुमार दोषी आणि चांदणी दोषी हे दाम्पत्य वसईतील वास्तव्यास होते. कुमार यांच्यावर विजय वल्लभ रुग्णालयात तर चांदणी यांच्यावर विरारमधीलच जिवदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण दोषी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्रयांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.