लोणी काळभोर (पुणे) – आळंदी म्हातोबा (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत घराचे बांधकाम करणारा ठेकेदार व कामगारांना भाईचे नाव घेऊन तलवारीने मारहाण केल्याप्रकरणी अज्ञात चौघां जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सादीक हुसेन कपूर (वय 50, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. सादीक कपूर हे अक्षय केशव दोमाले (रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती) यांच्या रामोशीवाडी, आळंदी म्हातोबा येथील घराचे काम करीत आहेत. चार कामगारांसह ते सध्या तेथेच रहात आहेत. मध्यरात्री दोन वाजता त्यांना पत्रा ठोकण्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. दरवाजा उघडून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सादीक कपूर यांना एकाने तलवारीने मारहाण केल्यामुळे त्यांची डाव्या हाताची तीन बोटे कापली. यावेळी तो व्यक्ती सादीक यांना म्हणाला कुणाच्या नादी लागला आहे? तू नीट रहा, आमच्या भाईला त्रास झाला, तर तुला संपवून टाकेन. त्यानंतर ते तेथून निघून गेले. सादीक कपूर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.