कार्यकर्त्यांनो सावधान..!

निवडणुकीसाठी मैत्रीत वितुष्ट आणू नका

सातारा – लोकसभेच्या मतदानासाठी आता केवळ 15 दिवसांचा अवधी बाकी राहिला असताना उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराची धुरा असलेल्या कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू आहे. त्याचबरोबर आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक संघर्ष देखील होताना दिसून येत आहे. साहजिकच गावा-गावातील आणि गल्ली बोळातील हे कार्यकर्ते परस्परांचे अनेक वर्षांपासूनच मित्र देखील आहेत. त्यामुळे निवडणूक आणि उमेदवारासाठी मैत्रीत वितुष्ठ निर्माण होवू नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

कोणतीही निवडणूक पाच वर्षानंतर येते. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. जिल्ह्यात माढा आणि सातारा मतदारसंघात सध्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. प्रचारांचा धडाका सुरू झाला आहे. उमेदवार विरोधी उमेदवारांवर सडकून टिका करताना दिसून येतात. साहजिकच त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण होवून एकमेकांमध्ये संघर्ष होत आहे. विशेषत: सोशल मीडियावर कार्यकर्ते व समर्थक एकमेकांवर व उमेदवारावर सडकून टिका करतायत.
निवडणुकीच्या मुद्यांवर चर्चा होणे निश्‍चितपणे गरजेचे आहे. मात्र, मुद्दे मांडताना करण्यात येणारी टिका-टिप्पणीमुळे मित्रत्वाच्या नात्याला नख लावणारे ठरत आहे.

त्यामुळे आपण कोणाचे कार्यकर्ते नंतर आहोत आणि अगोदर मित्र आहोत, ही बाब विशेषत: युवकांनी लक्षात घेतली पाहिजे. निवडून येणारा अथवा पडणाऱ्या उमेदवारापेक्षा सगळ्यात अगोदर मित्रच मित्राच्या मदतीला धावून येणार आहे, हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. आजपर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमुळे अनेक वर्षांची मैत्री तुटली असल्याची उदाहरणे पाहता येतील. त्याचबरोबर निवडून येणारा व पडणारा उमेदवार निवडणुकीनंतर एकत्र आल्याची उदाहरणे आहेत. सध्या त्याचा प्रत्यय देशात, राज्यात आणि सातारा जिल्ह्यात ही येत आहे. त्याचबरोबर व्यवसायिक राजकारणी स्वार्थासाठी एका रात्रीत पक्षांतर करताना दिसत आहेत. तर काही राजकारणी अनेक वर्षाचे वैर बाजूला ठेवून शत्रुला मित्र करताना दिसून येत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर युवकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.