शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल

रासायनिक खतांचा होतोय कमी वापर
अविनाश काशीद

पुसेसावळी – मागील काही वर्षापासून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी सेंद्रीय शेतीचे महत्त्व ओळखून जाणकार शेतकरी ही सेंद्रीय शेतीकडे वळू लागले आहेत. पीक लवकर आणि जास्त प्रमाणात उत्पादन मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात रासायनिक खत, कीटकनाशकांचा उपयोग शेतकऱ्यांनी केला आहे. तथापि, गेल्या काही वर्षांतील निरीक्षणानुसार रासायनिक खतांच्या वापरातून अन्नधान्य, भाजीपाला शरीराला हानीकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यांबरोबरच जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता कमी होताना दिसते. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अतिवापर, जनुकीय बदल केलेली अन्नधान्ये, फळे, भाजीपाला यांचा अमर्याद वापर यांबरोबरच कारखाने व उद्योगांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे झरे, विहीर, तळी यातील जलचरांवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. अन्नधान्य, दुग्धोत्पादन, मांस उत्पादनातही विषारी अंश आढळत आहेत. याचा विपरीत परिणाम मानवी शरीरावर होत आहे. अशा आहाराच्या सेवनाने कर्करोग, त्वचारोग तसेच विविध प्रकारचे पोटाचे आजार अशा घातक आजारांच्या विळख्यात सापडण्याची शक्‍यता बळावली आहे. याबरोबरच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे सेंद्रीय शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना उमगू लागले आहे.

अनेक जाणकार तसेच प्रयोगशील शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळू लागले आहे. सेंद्रीय शेतीमधून त्यांनी मिळवलेल्या भरधोस उत्पन्नामुळे इतर शेतकऱ्यांनाही यापासून प्रेरणा मिळू लागली आहे. त्याचबरोबरच सेंद्रीय शेतीतून उत्पादित होत असलेल्या भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्य, हळद, नैसर्गिक मध, गुळ, काकवी, हातसडीचा तांदूळ, लाकडी घाण्यावरील खाद्यतेले यांच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यामुळे सेंद्रीय कृषीमालाला चांगले दिवस येत असल्याचे दिसून येत आहे. सेंद्रीय शेतीमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते.

मातीवर सावली निर्माण होवून तापमान वाढत नाही. सेंद्रीय पदार्थ माती घट्ट धरुन ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रीय खतांमुळे शक्‍य आहे. सध्या विषमुक्त अन्नधान्य उत्पादनांना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे आढळून येत आहे. ज्वारी, गहू, भुईमुग, कडधान्ये, भाजीपाला, फळे, ऊस, हळद, हातसडीचा तांदूळ इत्यादी पिकांचे उत्पादन घेता येते. ही बाब शेतकरी वर्गाच्या लक्षात आल्यानंतर रासायनिक खतांच्या वापर कमी करून विषमुक्त अन्नपदार्थ निर्मितीकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.

 

देशी गाय केंद्रीत सेंद्रीय शेती

सेंद्रीय शेतीमध्ये देशी गाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर पंचगव्यालाही महत्त्व आहे. गाय व सेंद्रीय शेती याचा एक जिव्हाळ्याचा संबंध आहे. देशी गाईच्या शेणामध्ये अनेक घटक आहेत.गायीच्या शेणामध्ये अब्जावधी प्रकारचे जीवाणू असतात. या जीवाणूची पेरणी जीवामृताच्या रुपातून जमिनीत विरजण म्हणून टाकायचे असते. गाईपासून शेण त्यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत, गोबर गॅस, शेतीसाठी शेण मूत्रापासून स्लरी व कसदार खत मिळते तसेच गोमूत्र कीटक नियंत्रणासाठी फवारता येते. देशी गाईचे शेण, दही, मूत्र, दूध आणि तुपापासून पंचगव्य तयार केले जाते,त्यासाठी शेतकऱ्यांनी प्राथमिक पातळीवर एक देशी गाई घेऊन सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाकडे वळण्याची गरज आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीचे आरोग्य खराब झाले आहे. यासाठी आता शेतकऱ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे.बियाण्यांपासून मार्केटिंगपर्यंत जे संघटीत होतील, तेच टिकतील. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे,अत्याधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्‍यक असून तरच शेतकरी व शेती समृद्ध होईल.

भुषण जाधव, प्रगतशील शेतकरी

पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढवून एकरी उत्पन्न वाढविणे शक्‍य आहे.

संभाजी कदम, सेंद्रीय शेती उत्पादक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.