मुंबई – मुंबईच्या मुंब्रा पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस अधिकाऱ्याला एका मोबाइल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक चोराला पकडण्यास टाळाटाळ करत थेट सुट्टीवर गेल्या. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत या अधिकारी चक्क मोबाइल चोरासोबत आढळल्या. या विचित्र प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.
आरोपी मोबाइल चोराचे नाव सबिर शेर अली सय्यद असे आहे. काही दिवसांपूर्वी या आरोपीची ओळख पटवण्यात मुंबई पोलिसांना यश आले. त्यांनतर त्याचे मोबाइल रेकॉर्ड चेक करण्यात आले असताना महिला पोलीस अधिकारी आणि आरोपी यांच्यात अनेक कॉल झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
खेरवाडी पोलिस सबिर शेर अली सय्यद याच्यावर लक्ष ठेवून असतानाच तो नवी मुंबईहून मुंबईला येत असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना खबरी मार्फत मिळाली होती. मात्र, आरेमध्ये येताच त्याचा मोबइल बंद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यावेळी त्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे मोबाइल लोकेशन आरे असल्याने पोलिसांनी परिसरात कारवाई केली. यावेळी त्या पवईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे उघड झाले. यानंतर खेरवाडी पोलिसांनी या हॉटेलवर जाऊन कारवाई केली. तेव्हा मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपीबरोबर पोलिसांना मुंब्रा पोलिस स्टेशनची महिला पोलीस अधिकारीही आढळल्या.