रियाध : महिलांना परदेश प्रवासासाठी पुरुषांची परवानगी आवश्यक असल्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सौदी अरेबियावर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यानंतर आता पुरुष पालकांच्या परवानगीशिवाय महिलांना परदेश प्रवासाला जाण्याची मुभा सौदी अरेबियाने दिली आहे.
सौदी अरेबियात मोटार चालवण्यास महिलांना असलेली बंदी गेल्या वर्षी उठवण्यात आली होती. या सुधारणा करूनही महिलांवर अनेक निर्बंध अजूनही आहेत. त्यात परदेश प्रवासासाठी पुरुषांची परवानगी हा एक नियम होता तो आता मोडीत काढला आहे. उम्मा अल कुरा या राजपत्रात म्हटले आहे की, अर्ज करणाऱ्या कुणाही सौदी नागरिकाला पासपोर्ट जारी करण्यात यावा. दरम्यान, सौदी अरेबियात सर्वच महिलांना कायदेशीर पातळीवर अल्पवयीन ठरवण्यात आले असून त्यांच्या पुरुष नातेवाईकांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आजही त्यांच्यावर कडक नियम लादण्यात आले आहेत.