पुणे -पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी महिलांना कर्मचाऱ्यांना रात्री उशीरा ड्यूटी न देण्याचे आदेश दिले असले तरी, डेपो व्यवस्थापकांकडून याची अंमलबजावणी होतना दिसत नाही. अजूनही अनेक मार्गावर महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशीरापर्यंत ड्यूटी दिली जात असल्याचे महिला कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पीएमपीमध्ये सुमारे 10 हजार कर्मचारी आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांची सुमारे 600 इतकी आहे. पीएमपीत कार्यालयात विविध पदांवर महिला कर्मचारी कार्यरत आहेत तसेच महिला वाहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक या पदावर गेले चार ते पाच वर्षांपासून महिला अधिकारी कार्यरत आहेत. पण, पीएमपीतील महिला कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना लक्ष घालावे लागले आहे.
चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली होती. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. विशेषत हंगामी रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला वाहकांच्या कामाची वेळ निश्चित नाही. महिला वाहक सकाळी कामावर आल्यानंतर देखील त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. तसेच त्यांना रात्री उशीरा पर्यंत ड्यूटी दिली जाते.
टाइम कीपरकडून या महिलांना योग्य वागणूक दिली जात नाही. तसेच असभ्य भाषा वापरली जाते. यामुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण असून, त्यांच्यात असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे. अशा तक्रारी महिला आयोगाकडे येत असून याबाबत बकोरिया यांना लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर बकोरिया यांनी वाहतूक व्यवस्थापकांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यानंतर पीएमपीमध्ये काम करणाऱ्या टाइम कीपर, गॅरेज सुपरवायझर व त्यांच्या मदतनिसांनी पीएमपीमध्ये काम करणाऱ्या महिलांना नम्रतेची वागणूक द्यावी. तसेच महिला वाहकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पहाटे लवकरची ड्यूटी देऊ नये तसेच त्यांना रात्री उशीर होणार नाही याची काळजी सर्व आगार प्रमुखांना घ्यावी अशा सुचना वाहतूक व्यवस्थापकांनी दिल्या आहेत.