पुणे – साडीपासून बनवलेली गोधडी, बांबूपासून बनवलेले टूथ ब्रश, घड्याळ, फळांची टोपली, दिवे, दैनंदिन जीवनातील अशा अनेक वस्तू. विविध प्रकारचे आकर्षक दागिने, मेळघाट येथील कोरकू, पारधी, भिल्ल समाजातील आदिवासी कारागीर बांधवांनी बनवलेल्या वस्तू तसेच आदिवासी बांधवांनी पिकवलेली सेंद्रिय धान्ये, मध “बदलते मेळघाट’ प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरत आहेत. अदिवासींच्या कला, कृती आणि संस्कृतीने पुणेकर अवाक झाले.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटची आदिवासी कला आणि संस्कृती पुणेकरांसमोर यावी, आदिवासी बांधवांच्या जीवनाचे विविध पैलू शहरी नागरिकांसमोर उलगडावेत या उद्देशाने पुण्यातील “मेळघाट सपोर्ट गृप’ आणि “अमनोरा येस फाऊंडेशन’ यांच्या वतीने “बदलते मेळघाट’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील अमनोरा मॉलच्या वेस्ट ब्लॉक या ठिकाणी आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्तेन झाले.
यावेळी डॉ. शैला वंजारवाडकर, संपूर्ण बांबू केंद्राच्या संचालिका निरुपमा देशपांडे, अमनोरा येस फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, “मेळघाट सपोर्ट ग्रुप’चे सदस्य संतोष नखाते हे उपस्थित होते. या प्रदर्शनातून मेळघाट हा घरोघरी पोहचण्यास मदत मिळेल. भारताच्या विकासामध्ये, आत्मनिर्भरतेमध्ये या सगळ्या कलाकार बांधवांचा सन्मान आणि कलांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. तो या प्रदर्शनात होत आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे, असे वंजारवाडकर म्हणाले.
गेली 27 वर्षे आम्ही मेळघाट येथे हे काम करत आहे. सामान्यपणे मेळघाट म्हटले की, कुपोषित भाग असे चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर येतात. मात्र हे चित्र बदलून, कला आणि उद्योगाचे केंद्र अशी नवी ओळख घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच यंदा प्रदर्शनात सहभागी करणारे कारागीर आणि कलाकार हे प्रथमच पुण्यात आपली कला सादर करत आहेत, त्यामुळे या प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे, असे देशपांडे म्हणाल्या.
हे प्रदर्शन आदिवासी बांधवांना त्यांची कला, कौशल्ये सादर करण्यासाठी शहरी भागातील नागरिकांना आदिवासी कला, संस्कृती अनुभवण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे, असे “मेळघाट सपोर्ट ग्रुप’चे मिलिंद लिमये यांनी सांगितले. विशाल कुमावत यांनी सूत्रसंचालन केले.