पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) :– भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदाद येथे खेळवला जात आहे. या मैदानावर भारताने शुक्रवारी पहिला एकदिवसीय सामना तीन धावांनी जिंकला. त्यानंतर आज भारताला मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याची संधी आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने संघात एक बदल केला आहे. गुडाकेश मोती दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीए. त्याच्या जागी हेडन वॉल्श ज्युनियरची निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज शाई होपचा हा 100 वा एकदिवसीय सामना आहे.
भारतीय संघात प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आवेश खानला संधी देण्यात आली आहे. आवेशचा हा पहिलाच एकदिवसीय सामना आहे. आवेश भारताकडून टी-20 सामने खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग-11 पुढीलप्रमाणे –
भारत : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, आवेश खान.
वेस्ट इंडिज : शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शामराह ब्रूक्स, काइल मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोवमन पॉवेल, अकील होसेन, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स, हेडन वॉल्श जूनियर.