Ind v Wi 1st Test Day 1 : डॉमिनिका टेस्टमध्ये कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर गोलंदाजीनंतर फलंदाजीतही टीम इंडियाने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती अगदी तशीच सुरूवातही Team India ने केली आहे.
वेस्ट इंडिजचा पहिला ङाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या आहेत. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात यशस्वीनं 73 चेंडूंमध्ये नाबाद 40 तर कर्णधार रोहित शर्मानं 65 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावांची खेळी केली.
भारत पहिल्या डावात वेस्ट इंडिजपेक्षा 70 धावांनी पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा Team India चा प्रयत्न असेल. दुसरीकडे, सामन्यात पुनरागमन करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
तत्पूर्वी, डोमिनिका टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेटचा हा निर्णय चूकीचा ठरवला. भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा पहिला ङाव अवघ्या 150 धावांवर आटोपला गेला.
वेस्ट इंडिज संघाकडून एलिकनं सर्वाधिक 47 धावा केल्या. त्यानं 99 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एक षटकार लगावला. इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट अवघ्या 20 धावा करुन माघारी परतला. तेजनारायण चंद्रपॉल 12 धावांवर आऊट झाला, तर कॉर्नवाल 19 धावांवर नाबाद राहिला. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
भारताकङून गोलंदाजीत आर अश्विननं 24.3 ओव्हर्समध्ये 60 धावा देत तब्बल 5 विकेट्स घेतले तर रवींद्र जाडेजानंही 14 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
आश्विनची विक्रमी कामगिरी…
आर. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 33 व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या सामन्यात रविचंद्रन अश्विनने विशेष कामगिरी केली. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्स पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत अनिल कुंबळे आघाडीवर आहे. कुंबळेने 956 विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत हरभजन सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. हरभजने 711 विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 271 सामन्यातील 351 डावात 702 विकेट्स आहेत.