सुरक्षा साधनांविना कचरावेचकांचे आरोग्य धोक्‍यात

भोसरीतील भयान परिस्थिती : भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांची परवड

चऱ्होली – राठ झालेले केस, पायांत असल्याच तर रबराच्या बंधतुटलेल्या चपला, काळपटलेलं अंग, त्यावर ठिगळं लावलेली मळकट चिंधीसदृश्‍य कपडे, पाठीवर पोतभर ओझं आणि हातात कचरा निवडायची आकडी, बकाल यातीतल राहणं, कचराकुंडीतील कागद, काच, पत्रा, प्लॅस्टिक वेगळं करून विकून चार पैसे मिळवणे, पत्रावळ्यांतल खरकटं गोळा करणं, कधी काहीच नाही मिळालं तर भीक मागून दिवस ढकलणं, असं आयुष्य आहे भोसरी परिसरातील शेकडो कचरावेचकांचे. ओल्या, सुक्‍या कचऱ्याने भरलेला टेम्पो, ट्रकची वाट पाहत या कचऱ्यातून आपल्या घराची चूल पेटवणाऱ्या भोसरी, मोशीतील कचरा वेचकांची स्थिती दयनीय आहे. पुरेशी सुरक्षा साधनांविना हे काम केले जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

कचरावेचक कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आलेली नाहीत. तसेच जीवघेण्या घाणीत, दुर्गंधीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पुरेशा आरोग्य सुविधा पुरविल्या जात नाहीत, त्यामुळे कचरावेचक कर्मचाऱ्यांची परवड कायम असून, महापालिका प्रशासनाने त्यांच्या आर्थिक स्थैर्याचा व आरोग्याचा विचार करण्याची मागणी होत आहे. भोसरी-आळंदी रस्त्यावरील मॅगझिन चौकाजवळ तसेच मोशी कचरा डेपो परिसरात काम करणाऱ्या कचरावेचकांचा दिवस सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतो.

सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या कचऱ्यातून आपली भाकरी शोधणारे कचरावेचक कायमच दुर्लक्षित राहिले आहेत. भोसरी, लांडेवाडी, शांतीनगर, फुलेनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती या भागातील झोपडपट्टी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष कचरावेचण्याचे काम करत आहेत. कचरा वेचून त्यातील प्लॅस्टिक, काच, लोखंड, भंगार साहित्य इतर पुन्हा वापरण्यासारख्या बाजूला केल्या जातात. त्यांची विक्रीतून कचरावेचकांना दिवसाला 100 ते 200 रुपये मिळतात. मात्र, कचरा वेचण्याच्या ठिकाणी असलेली दुर्गंधी, दूषित पाण्यामुळे कचरावेचकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यांना आजारांनी कायम ग्रासलेले असते परिणामी आयुर्मान कमी होते.

आरोग्यापेक्षा उदरनिर्वाह महत्त्वाचा
आमचे आयुष्य कचरा वेचण्यात चालले आहे. परंतु आमच्या मुलांनी शिक्षण घेऊन चांगली नोकरी अथवा व्यवसाय करावा या साठी आम्ही कष्ट करत आहोत. दिवसाला कचऱ्यातून 50 ते 60 किलो पुन्हा वापरण्या योग्य किंवा वस्तू गोळा करतात. त्यामुळे 100 ते 200 रुपयांची कमाई होते. तर भंगार, प्लॅस्टिक गोळा केलेला माल भंगारवाले घेतात. पैसे देतात, कधी कधी उधारही ठेवतात. आम्हाला आमच्या आरोग्यापेक्षा उदरनिर्वाह कसा करावा हा मोठा प्रश्‍न आहे.

मुलांच्या भविष्याची चिंता
दिवसभर कचऱ्यातून आवश्‍यक वस्तू बाजूला काढून त्याच्या विक्रीतून कचरावेचकांचा उदरनिर्वाह चालतो. अशाही स्थितीत आपल्या मुलांना शाळेत घालून त्यांना शिक्षण देण्यासाठी हे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. शहराच्या वाढत्या नागरीकरणामुळे दररोज 40 टन ओला आणि सुका कचरा कचरावेचकांकडून निवडला जातो. या कामात कचरावेचकांचे कुटुंब जुपले जाते. यात लहान मुले आणि महिलाही असतात. श्‍वास कोंडणारी दुर्गंधी, जीवघेण्या वासातून हे कचरा वेचक रोज आपली भाकरी शोधतात. या धोकादायक कामामुळे कचरा वेचकांना व्यसने लागतात. आरोग्याच्या कायम होणाऱ्या हेळसांडीमुळे शरीराचा ताबा जीवघेणे आजार घेतात.

दुष्काळ पडल्यावर आम्ही इथे आलो. माझी सास, पती कचरा गोळा करतच मृत्यू पावले. आम्हाला दुसरे काम दिले जात नाही. मायबाप सरकार गरिबासाठी काहीच करत नाही, अशी खंत औसाबाई यांनी भरल्या डोळ्यांनी व्यक्त केली.

– औसाबाई, कचरावेचक


लखन यांच्या तीन मुली भोसरीतील महापालिकेच्या शाळेत शिकत आहेत. लखनला कसलेही व्यसन नाही. घरी आल्यावर जंतूनाशक साबणाने आंघोळ करून घरची जबाबदारी पार पाडायला मोकळा होतो. माझी आई कचरावेचक म्हणून काम करत होती. आता मी हे काम करत आहे. दुसरे काम मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. सध्या ते कचरावेचकाचे काम करत आहेत.

– लखन, कचरावेचक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.