टेस्ट निगेटिव्ह, परंतु फुफ्फुस डॅमेज?

करोना व्हायरसच्या डबल म्युटेशनच्या परिणामांची शक्‍यता


विषाणूचा नवा व्हेरिएंट आहे का, यालाही दुजोरा मिळेना

पुणे – करोनाची टेस्ट निगेटिव्ह परंतु फुफ्फुस डॅमेज असा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात दिसत असून, हे करोना व्हायरसचे “डबल म्युटेशन’ असल्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

एखाद्या व्यक्‍तीला दम लागत असेल, श्‍वास घेण्याला त्रास होत असेल आणि त्याची करोना टेस्ट केली; तर ती निगेटिव्ह येते. परंतु त्याच्या फुफ्फुसाचे स्कॅनिंग (सिटी स्कॅन) केल्यानंतर त्यात 80 ते 90 टक्‍केफुफ्फुसात संसर्ग आढळतो. असे प्रकार सध्या मोठ्याप्रमाणात सुरू असून, अनेक रुग्णांना ऑक्‍सिजनची पातळी खालावून जीव गमवावा लागला आहे.

हे डबल म्युटेशन आहे का म्हणजे एका व्हायरसमध्ये दोन म्युटेशन झाले आहे का, याविषयीची चाचपणी सुरू आहेच; परंतु हा व्हायरसचा नवा व्हेरिएंट आहे का, यालाही अद्याप दुजोरा मिळाला नाही.
रुग्णाला ताप आल्यानंतर किंवा धाप लागल्यानंतर सध्या रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाते. ती निगेटिव्ह येते. त्यानंतर आरटी-पीसीआर पण निगेटिव्ह येते. त्यामुळे अनेकजण निश्‍चिंत होतात आणि अन्य उपाय सुरू होतात. परंतु “एचआरसीटी स्कॅन’ केल्यानंतर मात्र फुफ्फुसाची स्थिती लक्षात येते आणि त्यात फुफ्फुसाचे बरेच नुकसान झाल्याचे दिसून येते. हा व्हायरस अतिशय वेगाने संक्रमित होणारा असून, सर्वाधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

करोनाची बाधा झाल्यानंतर “सीटी व्हॅल्यू’च्या आधारे संसर्गाची तीव्रता समजू शकते. परंतु या नव्या व्हेरिएंटमुळे तेही समजत नाही आणि त्याचा परिणाम थेट फुफ्फुसावर होतो आणि तोही “मेजर’ असतो. यामध्ये दोन ते तीन दिवसांतच फुफ्फुस पांढरे दिसू लागतात आणि त्या व्यक्तीला न्यूमोनिया झालेला असतो. चारच दिवसांत फुफ्फुस जवळपास 45 टक्‍के डॅमेज झालेले असते आणि सात दिवसांत 70 टक्‍के डॅमेज होते, असे निरीक्षण समोर येत आहे.

ऑक्‍सिजन लेव्हल कमी झाल्यास त्वरित तज्ज्ञांना भेटा
आपल्याला जर श्‍वास घेण्यात त्रास होत असेल, ऑक्‍सिजन सॅच्युरेशन कमी असेल. थंडी ताप असेल, चव किंवा वास कळत नसेल, तर आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली तरी निश्‍चिंत राहू नका. त्वरित तज्ज्ञांना भेटा. उर्वरित तपासण्या होईपर्यंत स्वतःला आयसोलेट करा. कुटुंबातील सदस्यांमध्ये मिसळू नका. एचआरसीटी किंवा रक्‍त तपासणीद्वारे संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकेल, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

अचानक प्रकृती खालावण्याच्या प्रकारांबाबत मागच्या लाटेतही काही उदाहरणे समोर आली होती. परंतु त्यावेळी त्यांची संख्या कमी होती; मात्र यावेळी टेस्ट निगेटिव्ह परंतु फुफ्फुसांचा संसर्ग जास्त अशी उदाहरणे अनेक पाहायला मिळत आहेत. यामध्ये थेट फुफ्फुसांचा संसर्गच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सीटी स्कॅनमधूनच तो समजतो.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.