बिजिंग – कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत ५०० जणांचा मृत्यू झाला असून, 15 हजारापेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. मात्र, यावर आता औषध शोधल्याचा दावा थायलंडमधील एका डॉक्टरने केला आहे. या औषधाने एका रुग्णाला फायदा झाला असल्याचेही सांगितले आहे. आता चीनमध्ये कोरोनाचा सर्वात लहान रुग्ण समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जन्मल्यानंतर तीस तासांत बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. या बाळाच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. बाळाला जन्म देण्यापूर्वी तिची तपासणी करण्यात आली होती. यात तिला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. तिनं मुलाला जन्म दिल्यानंतर ते मुलं सुरक्षित होतं. त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र जन्मल्यानंतर ३० तासांत त्यालादेखील या विषाणूची बाधा झाली आहे.