मित्रांच्या मदतीने मुलानेच केला बापाचा खून

पारनेर – पारनेर तालुक्‍यातील निघोज परिसरामध्ये 27 ऑगस्ट पेटीत भरून टाकलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. मृतदेहाची ओळख पटली असून, अनैतिक संबंध असल्याने आईला त्रास देणाऱ्या बापाचा मुलानेच मित्रांच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी मुलासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी निघोज येथील कुकडी नदीपात्रात कुंड परिसरात एका पत्र्याच्या पेटीत 40 वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह आढळला होता.

याबाबत माजी सरपंच दामू धोंडिबा घोडे (रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पारनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी श्‍वान पथक, ठसेतज्ज्ञ, सायबरतज्ज्ञांच्या पथकासह भेट दिली होती.

तसेच पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी लगतची गावे, एमआयडीसी भागात जावून माहिती संकलीत केली. दरम्यान शिरूर येथील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सतीश सदाशिव कोहकडे (रा. कोरेगाव, ता. शिरूर) ही व्यक्ती हरवल्याचा अर्ज दाखल झाला होता.

कोहकडे यांच्या वर्णनाशी मृतदेहाचे वर्णन जुळत होते. त्यानंतर पोलिसांनी कोहकडे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून मयताचे कपडे व इतर वस्तू दाखवल्या. नातेवाईकांनीही हा मृतदेह कोहकडे यांचा असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृताचा मुलगा प्रदीप सतीश कोहकडे याची सखोल चौकशी केली असता, त्याने वडील आपल्या आईला अयोग्य वागणूक देत होते. तसेच घरभाड्याचे व शेतीचे सर्व पैसे अनैतिक संबध असलेल्या महिलेवर खर्च करत होते.

त्यामुळे वडिलांशी होत असलेल्या वादातून मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे यांनी त्यांच्या दोन साथिदारांसह वडिलांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तोंड दाबून कापडी पट्ट्याने गळा आवळून खून केला. तसेच मृतदेह पेटीत टाकून निघोज येथील कुंडावरील पुलावरुन पाण्यामध्ये टाकून दिल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी प्रदीप कोहकडे याच्या दोन साथिदारांनाही अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.