#HappyBirthdayMithaliRaj : महिला क्रिकेटमध्ये मितालीचेच ‘राज’

पुणे – भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय  आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज  आज 38 वा वाढदिवस साजरा करीत आहे. उजव्या हाताची फलंदाज मितालीचा जन्म राजस्थानच्या जोधपूर येथे 3 डिसेंबर 1982 रोजी झाला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 दशकांपेक्षा अधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळणारी मिताली राज एकमेव आणि  पहिली महिला क्रिकेटपटू आहे. जून  1999 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात मिताली राजने एकदिवसीय संघात पदार्पण केले आणि तेव्हापासून ती सतत भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत आहे. वयाच्या 16 (16 वर्षे 250 दिवस )व्या वर्षी मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 

जानेवारी 2002 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून मिताली राजने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मिताली राज टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली आहे, परंतु अद्याप एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. ऑगस्ट 2006 मध्ये मिताली राजने टी-20 मध्ये पदार्पण केले होते आणि मार्च 2019 मध्ये ती शेवटचा टी-20 सामना खेळली आणि  त्यानंतर निवृत्त झाली. 

– तिने  आतापर्यंतच्या  कारकिर्दीमध्ये 10 कसोटीमध्ये 663 धावा, 209 एकदिवसीयमध्ये  6,888 धावा तर 89 टी-20 मध्ये 2,364 धावा केल्या आहेत.  एकदिवसीय सामन्यात 7 शतक आणि 53 अर्धशतक तर  कसोटीत 1 शतक आणि 4 अर्धशतक  तिच्या नावे आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 17 अर्धशतके तिने लगावली आहेत.

-आंतरराष्ट्रीय  एकदिवसीय  क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6,888 धांवाची आणि टी-20 क्रिकेट मध्ये भारताकडून सर्वाधिक 2,364 धावा करण्याची नोद तिच्या नावावर आहे.

-एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येच सलग सात अर्धशतक झळकवण्याचा विक्रमही तिच्या नावे आहे.

-महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 53 अर्धशतकांची नोंद मितालीच्या नावावर आहे.

– कसोटीमध्ये 214 ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताकडून कुठल्याही महिल्या क्रिकेटपटूने झळकवलेली ती सर्वोच्च धावसंख्या आहे. 16 आॅगस्ट 2002 रोजी तिने ही खेळी केली होती.

–  तिचा 2003 साली अर्जुन पुरस्कार तर  2015 साली पद्मश्री पुरस्कारानेही (2015)  सन्मान करण्यात आला आहे. तसेच तिला 2015 मध्ये विस्डेनचा सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटूही ठरली आहे. आणि

-दरम्यान, मिताली राज हिच्यावर बायोपिक येणार असणार चित्रपटाचे पोस्टरसुध्दा रिलीज झाले आहे. ‘शाब्बास मिथू’  असे चित्रपटाचे नाव आहे.  हा चित्रपट पुढील वर्षी 5 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. बायोपिकमध्ये तापसी पन्नू झळकणार आहे.

-लहानपणी  मिताली खूप आळशी होती . त्यामुळे तिला शिस्त लागावी आणि आळशीपणा जावा यासाठी तिची क्रिकेट खेळाशी ओळख करून देण्यात आली. तिच्या वडिलांनी तिला क्रिकेट खेळण्यासाठी खूप प्रेरित केले. तिचे वडील इंडियन एअर फोर्समध्ये होते.

-मितालीला लहानपणी शास्त्रीय नृत्यामध्ये आवड होती. तिने भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे धडेही गिरवले होते. तिला यात कारकिर्दही घडवायची होती. पण नंतर ती क्रिकेटकडे वळाली. तिने  वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.  त्यानंतर जवळपास 6 वर्षांनंतर तिला देशाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून ती सतत भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत आहे.  तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

-स्वप्निल हजारे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.