लंडन – विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्वी फेरीच्या सामन्यात चेक प्रजासत्ताकची स्टार टेनिसपटू मारिया बुज्कोव्हाने आगेकूच कायम राखली. तिने फ्रान्सची मानांकित टेनिसपटू कॅरोलिना गार्सियाचा 7-5, 6-2 असा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला.
तर शनिवारी झालेल्या सामन्यात महिला एकेरीत स्पेनच्या पाऊला बदोसाने सनसनाटी निकाल नोंदवताना चेक प्रजासत्ताकची अव्वल मानांकित खेळाडू पेट्रा क्विटोव्हाचा 7-5, 7-6 असा पराभव केला. बदोसाने या सामन्यात पेट्राला व्हॉली व बेसलाईनच्या खेळाने त्रस्त केले होते. तसेच आपल्या सर्व्हिस राखत हा सामना जिंकला.
कझाकिस्तानच्या एलेना रायबान्काने आगेकूच करताना चीनच्या क्विनवेन झेंगचा 7-6, 7-5 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. रुमानियाची स्टार खेळाडू सिमोन हालेपनेही आपले विजयी सातत्य कायम राखताना पोलंडच्या मेग्देलना फ्रेचवर 6-4, 6-1 अशी सहज मात केली.
पुरुष एकेरीत स्पेनचा अग्रमानांकित टेनिसपटू राफेल नदालने इटलीच्या लॉरेंगो सोनेगोवर 6-1, 6-2, 6-4 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली. ग्रीसच्या स्टोफानोस त्सित्सिपासलाही पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गियॉसने त्याच्यावर 6-7, 6-4, 6-3, 7-6 अशी मात केली. नेदरलॅण्ड्सच्या बोटीक वॅन दी जण्डशपनेदेखील स्पर्धेतील आश्चर्यकारक निकाल नोंदवताना फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटवर 7-5, 2-6, 7-6, 6-1 असा विजय मिळवला.