पावसाळा वाहतूक कोंडीतच जाणार का?

नागरिकांचा संतप्त सवाल : आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्व रस्ते जाम

पुणे -पावसामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. नवीन खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे, कमी पावसातदेखील ठप्प होणाऱ्या सिग्नल यंत्रणेसह बेशिस्त वाहतुकीमुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच (सोमवारी) नागरिकांना फटका सहन करावा लागला. त्यातच मेट्रोची कामे आणि चारचाकी वाहनांमुळे कोंडी वाढत आहे. या परिस्थितीने नागरिक वैतागले असून “संपूर्ण पावसाळा वाहतूक कोंडीमध्ये जाणार का’ असा सवाल करण्यात आला.

सोमवारी सकाळी 10 वाजता शहरातील मुख्य रस्त्यांवर कोंडी व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास टिळक रस्ता, कोथरुड, डेक्कन परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर काही काळ वाहतूक संथ होती. पुन्हा सायंकाळी वाहतूक कोंडीची परिस्थिती “जैसे थे’ झाली. शाळा, कॉलेज सुरू झाल्याने स्कूलबस, व्हॅन आणि दुचाकींची भर पडली. त्यातच मेट्रोच्या कामांमुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी अंतर्गत रस्त्यांचा पर्याय अवलंबला. त्यामुळे ते रस्तेही जाम झाले.

अभिनव महाविद्यालय चौकापासून अलका टॉकिज चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच जोड रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने कोंडीमध्ये भर घातली. दुपारी बारा आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या भागातील शाळा आणि कॉलेजमुळे येणाऱ्या वाहनांची कोंडीमध्ये भर पडत होती. डेक्कनकडून कर्वे रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामध्येच म्हात्रे पूल आणि प्रभात रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांची भर पडत होती. यासह फर्गसन महाविद्यालय रस्त्यावर देखील चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे-सातारा रोड, सारसबाग, नीलायम टॉकिज, गांजवे चौक, शास्त्री रस्ता, दांडेकर पूल, सिंहगड रस्ता, संगमवाडी पूल, संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, सिमला ऑफिस चौक, शाहीर अमर शेख चौक, नरपतगिरी चौक, पुणे स्टेशन, मुंढवा, घोरपडी (नॅशनल वॉर म्युझियम), ई-स्ट्रीट व्होल्गा चौक, पोलीस आयुक्तालय चौक येथे “प्रचंड’ वाहतूक कोंडी झाली होती.

सिग्नल यंत्रणा ठप्प
सुरळीत वाहतुकीसाठीची सिग्नल यंत्रणादेखील सोमवारी बंद पडत होती. त्यामुळे कोंडीचा भार वाहतूक पोलिसांवर पडत होता. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यामध्ये सिग्नलची अवस्था अशीच राहणार का, असा प्रश्‍न आहे.

संथ सुरू असणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे आणि विकासकामांमुळे वाहतूक संथ होती. याबाबत आम्ही महानगरपालिका आणि शाळांबरोबर चर्चा करत आहोत. रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या स्कूल बसेस आणि व्हॅन शाळेच्या पटांगणावर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.