लांडे, बनसोडे राष्ट्रवादीकडून विधानसभा लढण्यास अनुत्सुक

पिंपरी – शहरातील तीनही मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी मागविण्यात आले आहेत. माजी आमदार विलास लांडे आणि अण्णा बनसोडे यांनी पक्षाकडे अर्ज सादर न केल्यामुळे हे दोन्ही नेते पक्षाकडून निवडणूक लढविण्यास अनुत्सुक असल्याचे आज समोर आले आहे. तर इतर 13 इच्छुकांनी आपले अर्ज पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून सादर केले आहेत.

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आक्‍टोबर महिन्यात होणार असून 15 सप्टेंबर 2019 च्या आसपास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राष्ट्रवादीने आतपासूनच सुरू केली आहे. होणाऱ्या विधानसभेसाठी बंडखोरी टाळता यावी, तसेच उमेदवाराला अधिकचा वेळ मिळावा, यासाठी पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागविले होते.

27 जून ते 1 जुलै या कालावधीत पक्षाच्या स्थानिक कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड शहरात तीन मतदारसंघ असून या तीन मतदारसंघातील 13 इच्छुकांनी विहित मुदतीत पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीच्याच दोन्ही माजी आमदारांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केलेला नाही. माजी आमदार विलास लांडे व अण्णा बनसोडे यांनी अर्ज सादर न केल्यामुळे ते राष्ट्रवादीकडून इच्छुक नसल्याचीच बाब समोर आली आहे.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे जाहीर केल्यामुळे या दोघांना अनुक्रमे भोसरी व पिंपरीतून उमेदवारी मिळणार का? याबाबत चर्चा रंगली होती. त्यातच आता या दोघांनीही पक्षाकडे अर्ज सादर न केल्यामुळे आपली दावेदारी मागे घेतली की काय? अशी चर्चा रंगली आहे. विहित मुदतीत पक्षाकडे अर्ज सादर करणाऱ्यांमध्ये चिंचवड मतदारसंघातून नाना काटे, मोरेश्‍वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, विशाल वाकडकर, राजेंद्र काटे यांनी, पिंपरीतून शेखर ओव्हाळ, राजू बनसोडे, सुलक्षणा धर-शिलवंत, गोरक्ष लोखंडे, सुनंदा काटे यांनी तर भोसरीतून विरोधी पक्षनेते दत्ता साने, दत्तात्रय जगताप आणि पंडित गवळी या इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.