भोपाळ – कॉंग्रेस पक्षातील “जी-23′ नेत्यांच्या गटाने कधीही गांधी परिवाराबाहेरील अध्यक्षांची अपेक्षा केली नाही, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे. आता पक्षांतर्गत निवडणुका तीन महिन्यांच्या अवधीमध्ये होणार आहेत. त्यामुळे “जी-23′ गटातील नेत्यांची मागणी पूर्ण झाली आहे, असेही कमलनाथ यांनी म्हटले आहे. आपल्या निवास्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे स्पष्टिकरण दिले.
गांधी कुटुंबाबाहेरील कोणी अध्यक्ष होण्याबाबत प्रश्न विचारल्यावर आता तीन महिन्यात पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत, असे उत्तर कमलनाथ यांनी दिले.
“जी-23’मध्ये सर्वच जण अनेक वर्षांपासूनचे आपले निकटचे सहकारी आहेत. त्यांच्यापैकी कोणीही अशी मागणी केलेली नाही. उलटपक्षी त्यांच्या सर्व मागण्या तर पूर्ण होत आहेत. पक्षांतर्गत निवडणुकांची मागणी करण्यात आली होती आणि आता निवडणुका होत आहेत.
पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या दारुण पराभवानंतर झालेल्या आढावा बौठकीमध्ये “जी-23′ गटाच्या नेत्यांनी पक्षांतर्गत सुधारणांची मागणी केली होती. त्या पार्श्वभुमीवर कमलनाथ यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे.