पुणे -करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविड केअर सेंटर्स लगेचच सुरू केले जाणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालये, केअर सेंटर्स लगेचच सुरू होतील. भविष्यात गरज पडली, तर जम्बो केअर रुग्णालयही सुरू करणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
हे सगळे सेंटर्स आवश्यकतेप्रमाणे सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत, असे राव म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भातील आमची तयारी सुरू झाली होती. केअर सेंटर्समध्ये मशिनरी किंवा अन्य मोठ्या साहित्याची फारशी गरज नसते.
ते दोन दिवसांत सुरू करू शकतो, परंतु जम्बो रुग्णालय सुरू करायला आठवड्याचा कालावधी लागेल. तेथे वैद्यकीय आणि इतर स्टाफची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे त्याची गरज पडली, तर त्याचीही तयारी असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या महिन्यांपासून महसूल प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. ठोस उपाय राबविले जात आहेत.