नागरिकांना मूलभूत सुविधा देणार : आयुक्त

ड्रेनेज लाइनच्या कामाबाबत नगरसेवक अविनाश घुले यांनी आंदोलनाचा दिला होता इशारा
आयुक्तांकडून इंदिरानगर परिसराची पाहणी
नगर (प्रतिनिधी) –
शरातील प्रभाग क्रमांक 11 मधील इंदिरानगर झोपडपट्टीतील प्रलंबित ड्रेनेजलाइन व परिसरातील रस्त्यांच्या कामाची पहाणी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केली. या प्रलंबित काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशा सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. याप्रसंगी नगरसेवक अविनाश घुले, शहर अभियंता सुरेश इथापे, कल्याण बल्लाळ, श्रीकांत निंबाळकर, गाडळकर आदी उपस्थित होते.

नगरसेवक घुले यांनी प्रभाग क्र.11 मधील इंदिरानगर झोपटपट्टीतील प्रलंबित असलेल्या ड्रेनेजलाईनच्या कामाबाबत मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेत मनपा आयुक्त यांनी परिसराची पहाणी करून संबधितांना सुचना केल्या. यावेळी घुले यांनी मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले की, शहरातील मोठ्या परिसरातून येणारी ही ड्रेनेजलाईन असून, ती जुनी झाल्याने ती वारंवार तुंबून परिसरात सतत घाण पाणी साचते व ते पाणी नागरिकांच्या अंगणापर्यंत येते. तसेच वारंवार ड्रेनेज चोकब काढण्यासाठी रस्तेही खोदावे लागत असल्याने रस्त्यांची कायम दुरावस्था झालेली असते. त्यातच हे घाण पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाइनमध्येही जात असल्याने पिण्याचे पाणीही खराब येते.

त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य होत असल्याने साथीचे आजारही वाढत आहेत. एकंदरीत ड्रेनेज लाइनमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे तातडीने ही ड्रेनेजलाईन बदलणे आवश्‍यक आहे. तसेच भविष्यातील लोकसंख्येचे विचार करुन या भागात मोठी ड्रेनेजलाइन टाकण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त मायकलवार यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी करुन, या भागातील ड्रेनेज लाईनचा महत्वाचा प्रश्‍न असून, त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. हा प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी मागील भागातील ड्रेनेज लाईनचे काम सुरु केले आहे. या भागात मोठी ड्रेनेजलाईनची आवश्‍यकता असून, त्याबाबत मनपा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर पुढील काळात या भागातील रस्त्यांचीही कामे हाती घेऊन नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील, असे सांगितले. यावेळी नागरिकांनीही आयुक्त मायकलवार यांना विविध प्रश्‍न मांडून परिसरातील समस्यांची जाणीव करुन दिली. तसेच नगरसेवक अविनाश घुले यांनी पाठपुरावा करुन या भागातील प्रश्‍न मार्गी लावत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.