Parineeti Chopra : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांचा राजस्थानमध्ये 24 सप्टेंबरला भव्य लग्न सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला मनोरंजनासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. लग्नाचे फोटो परिणीतीने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतरच परिणीतीने पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली. लग्नानंतर परिणिती अक्षय कुमारसोबत ‘मिशन रानीगंज’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता परिणीती राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
गुजरातच्या वडोदरामध्ये एका कार्यक्रमासाठी परिणीतीने हजेरी लावली होती. त्यावेळी तिला भविष्यात कधी राजकारणात येणार असल्याचा विचार आहे का? असा सवाल करण्यात आला. यावर तिने राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले. परिणीती म्हणाली की, “तुम्ही मला राजकारणात येताना पाहाल असं मला वाटत नाही. जसे राघवला बॉलिवूडबद्दल काहीच माहिती नाही आणि मला राजकारणाबाबत कल्पनाही नाही. आम्ही दोघे सार्वजनिक जीवनात आहोत, तरीही संपूर्ण देशातून इतके प्रेम मिळेल याची कल्पना आम्हाला नव्हती. मला वाटते की जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर तुमचे वैवाहिक जीवन खूप छान आहे’.
परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच ती ‘चमकीला’ या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. दिलजीत अमर सिंग चमकिलाची भूमिका साकारणार आहे, तर परिणीती त्यांची पत्नी अमरजोत यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. लग्नाआधी अभिनेत्रीने दिलजीत दोसांझसोबत इम्तियाज अलीसच्या ‘चमकिला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. या चित्रपटासाठी तिने तब्बल 15 किलो वजन वाढवले होते. वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत तिने याबाबत सांगितले होते.