पंढरपूर – विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या महिनाभरात विधान परिषदेची निवडणूक जाहीर होईल. विधान परिषदेसाठी जिल्ह्यात सुमारे 415 मतदार असून, त्यापैकी तब्बल 300 मतदार हे भारतीय जनता पार्टी समर्थक आहेत. मात्र, विधान परिषद निवडणूक ही पक्षावर नसून घोडेबाजारावर चर्चेत राहते.
2015 सालच्या विधान परिषद निवडणुकीवेळी सध्या ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची 300 मते आहेत, त्याच पद्धतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सुमारे 250 ते 300 मते होती. तरीही भारतीय जनता पार्टी समर्थक प्रशांत परिचारक यांचा विजय झाला होता. त्यांनी त्या निवडणुकीत मोठा खर्च केला होता, अशी चर्चा होती.
सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांचे नाव आघाडीवर आहे. त्यानंतर माजी आमदार राजन पाटील, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, पंढरपूरचे कल्याणराव काळे यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते. महेश कोठे यांचेही नाव चर्चेत असले तरी ते विधान परिषद लढवण्यास इच्छुक नसल्याचे समजते आहे. त्यामध्ये दिलीप माने यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक आहे.
परंतु दिलीप माने यांना खुद्द जिल्हाध्यक्ष काका साठे यांचा विरोध असल्याची चर्चा आहे, त्याचबरोबर त्यांचे महेश कोठे यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीनंतर जास्त जमत नाही. इकडे कॉंग्रेसमध्ये शिंदे फॅमिली कितपत सहकार्य करणार हासुद्धा मुद्दा आहे. तरीही राष्ट्रवादीकडून तेच तगडे उमेदवार होऊ शकतात, त्यांची तयारीसुद्धा आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस ऐनवेळी हुकमाचा एक्का म्हणून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना सोलापूरच्या मैदानात उतरवतील, अशीही चर्चा सोशल मीडियामधून आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीकडून प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिला असून, अपक्ष चिन्हावर ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा माध्यमातून वाचण्यात आली.