उत्तर कोरियाकडून पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राची चाचणी

सेऊल – उत्तर कोरियाने मंगळवारी दक्षिण कोरियाच्या समुद्रामध्ये एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. दक्षिण कोरियाने म्हटल्याप्रमाणे हे क्षेपणास्त्र पाणबुडीतून डागण्याचे होते.

दक्षिण कोरियाच्या समुद्रामधील पूर्वेकडील पोर्ट ऑफ शिंपो जवळ हे क्षेपणास्त्र पडले, असे दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ ऑफ स्टाफने म्हटले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या तज्ञांकडून या चाचणीचे विश्‍लेषण केले जात असल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाने राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि या चाचणीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

ही चाचणी समुद्रात जरी झाली असली तरी हे क्षेपणास्त्र युद्धनौकेतून सोडले गेले होते की पाणबुडीतून सोडले गेले होते, याची ठोस माहिती दक्षिण कोरियाकडून दिली गेलेली नाही. उत्तर कोरियाने दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली असे जपानच्या तज्ञांनी म्हटले आहे. या चाचणी नंतर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी आपला निवडणूक प्रचार अर्धवट सोडला आणि तज्ञांबरोबर चर्चा केली.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची ज्यो बायडेन यानी सूत्रे स्वीकारल्यानंतर उत्तर कोरियाने घेतलेली ही सर्वात मोठी चाचणी आहे, असे मानले जात आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमांबाबत उच्चस्तरिय पातळीवरील चर्चा पुन्हा सुरू करण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. त्यानंतर लगेचच उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरियाच्या लष्करी सामर्थ्य वाढीचे प्रयत्न अव्याहतपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.