खरे अन् खोटे कोण, या द्विधामनस्थितीत सभासद अडकले
रोहन मुजूमदार
पुणे – माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आखाडा तापला असून सत्ताधारी, विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे कोण खरे अन् कोण खोटे या द्विधामनस्थितीत सभासद अडकले आहेत. तर महाविकास आघाडीच्या छताखालीच निवडणूक लढवली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे, कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे या भाजपच्या गुरू-शिष्याच्या जोडीची “डोकेदुखी’ वाढली असून भाजप त्यांना सर्व ताकदीनिशी साथ देणार का सोडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पवारांच्या बारामतीत अन् हातातील कारखाना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा एक “डाग’ मानला जात असून याचे शल्य शरद पवारांसह अजित पवारांच्या मनात कायम आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत या गुरु-शिष्याच्या जोडीला हरवण्यासाठी व शरद पवारांना विजयी “गिफ्ट’ देण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली असून ते मंत्रालयात (मुंबई) असले तरी त्याठिकाणाहून ते सूत्र हलवित आहेत.
जिल्ह्यातील सर्व कारखान्यामधून सर्वाधिक दर देण्यामध्ये माळेगाव साखर कारखाना अग्रभागी असून यंदाही ती परंपरा कारखान्याने कायम राखली आहे. त्यामुळे तावरे गटासाठी हा जरी “प्लस’ पॉईट असला तरी यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही. त्यातच भाजपमध्ये बंडाळी उफाळून आली असून ती शमवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते त्यात गुंतले असल्याने ते या दोघांना ताकद पुरवण्यात कमी पडत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे तर निवडणूक जस जसी जवळ येईल तसे भाजपचे “स्टार प्रचारक’ बारामतीत तळ ठोकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हर्षवर्धन पाटलांची साथ मिळणार का?
इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार तथा आघाडी सकरकारच्या काळात सहकारमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटलांनी कामकाज पाहिले आहे. तर विधानसभा निवडणुकीत पाटलांनी “पंजा’ची साथ सोडून भाजपचे “कमळ’ हाती घेतले आहे. त्यांना कारखान्याचा आणि सहकारातील “खाचखळगे’ माहित असून अजित पवारांसोबत काम केले असल्याने त्यांना राजकीय “निती’ही अवगत आहे. माळेगाव कारखाना निवडणुकीत गुरु-शिष्याच्या जोडीला त्यांची साथ मिळाली तर कारखान्यावर “कमळ’ फुलवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मात्र, गुरु-शिष्याची जोडी त्यांची साथ घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
अजित पवारांना “टेन्शन’!
माळेगावच्या निवडणुकीत गुरु-शिष्याच्या जोडीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या “पॅटर्न’ राबवण्याची घोषणा पवारांनी केली आहे. मात्र, शिवसेना सहकार क्षेत्रात थोडी कमकुवत असून कॉंग्रेसमध्ये सहकारातील अभ्यासू व्यक्ती असल्यातरी तिनही पक्षांची मूठ बांधून ठेवण्यासाठी अजित पवारांचा मोठा कस लागणार आहे. त्यातच संचालक व अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतच मोठी “रस्सीखेच’ असल्याने “बंडाळी’ची शक्यता असल्याने अजित पवारांना निवडणुकीचे “टेन्शन’ आले आहे का? अशी कुजबुज सध्या माळेगाव कार्यक्षेत्रात रंगली आहे.