बारामती विधानसभेची जागा रासप लढविणार?

दौंड, इंदापूर, भोर आणि शिरूर मतदारसंघ देण्याचीही भाजपकडे मागणी

– संतोष गव्हाणे

पुणे – बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांना पराभूत करणे हा आशावाद ठरेल, असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असले तरी बारामतीची मागणी करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा पवार यांना आव्हान दिले आहे.

रासपने बारामतीसह दौंड, इंदापूर, भोर आणि शिरूर या पाच मतदारसंघाची मागणी केली आहे. हे मतदारसंघ रासपकडे गेल्यास विधानसभा निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने बारामती विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असले तरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आलेले अपयश तसेच बारामतीतील पवार यांचे वर्चस्व पाहता सद्यस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला लढत देणे भाजपला अवघड वाटत आहे. परंतु, मित्र पक्षाला ही जागा देऊन पवार यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्याचा पर्याय भाजपने खुला ठेवला आहे. बारामती विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता 1962 पासून ते आतापर्यंत हा मतदारसंघ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच ताब्यात राहिला आहे. भाजप-शिवसेना युती जागा वाटपातही हा मतदार संघ ज्येष्ठ नेते शरद पवार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रिपूर्ण राजकारणातून भाजपकडेच दिला गेला आहे. बारामती काबीज करण्याकरीता भाजपने अनेकदा येथे लढत दिली आहे.

2014 मध्ये भाजपकडून बाळासाहेब उर्फ प्रभाकर गावडे यांनी अजित पवार यांना लढत दिली होती. यात अजित पवार यांनी गावडे यांचा 89 हजार 791 मतांनी पराभव केला होता. परंतु, सद्यस्थितीत भाजपची “हवा’ असल्याने याचा फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून लोकसभेला बारामतीत लढत देण्याचा प्रयत्न भाजपने केला मात्र, यामध्ये अपयश आल्याने विधानसभेला भाजपकडून सावध खेळी केली जात आहे. यातून महसूल मंत्री पाटील यांनी बारामतीत अजित पवार यांचा पराभव करणे अवघड असल्याचे सांगत 2024 मध्ये मात्र आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघावर निश्‍चितपणे वर्चस्व गाजवू, असा आशावाद व्यक्त केला आहे. परंतु, ही जागा मित्र पक्षांना देण्याबाबतचा पर्यायही खुला ठेवण्यात आला असून अजित पवार यांच्या विरोधात तेवढ्याच ताकदीचा उमेदवार असल्यास हा मतदार संघ भाजपच्या मित्र पक्षाकडे दिला जाऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती मतदारसंघाची मागणी केली आहे. याबाबत शेळी मेंढी विकास मडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी झाली असून राज्याचे उपाध्यक्ष अजित पाटील, संदीप चोपडे, दादासाहेब केसकर, माणिकराव दांगट पाटील, अण्णासाहेब रूपनवर, माणेर काझी, नितीन धायगुडे, श्रद्धा भामंब्रेकर, लक्ष्मण हाके आदींच्या उपस्थित बैठक झाली.

रासप नको, भाजपतून लढा…
दौंड तालुक्‍यात राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार असला तरी या तालुक्‍यात खरोखरच रासपची ताकद आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. आमदारांचे कट्टर कार्यकर्ते मात्र रासपचे अध्यक्ष तथा मंत्री महादेव जानकर यांच्यावर नाराज असल्याचे वेळावेळी स्पष्ट झाले आहे. राहुल कुल यांना निवडून द्या.., मंत्री करतो, असे आश्‍वासन दिले गेले होते. त्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. परंतु, कुल यांना डावलून अध्यक्ष जानकर यांनी स्वत: मंत्रीपद पदरात पाडून घेतले. तेंव्हा पासून कुल यांच्या कार्यकर्त्यांत खद्‌खद्‌ कायम आहे. यामुळे रासपतून नको आता भाजपतूनच लढा… अशी गळ कुल यांना घातली जात आहे.

दौंड घ्या आणि बारामती द्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची राजकीय जवळीक भाजप आणि रासपमध्ये अनेक वेळा मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. भीमापाटस साखर कारखान्यावरील कर्ज, तालुक्‍यातील विकासकामांसाठी विशेष निधी यासह विविध कामी आमदार कुल यांच्या मदतीकरिता मुख्यमंत्री धावून आले आहेत. यातूनच कुल हे रासप पेक्षा आता भाजपचेच समजले जावू लागले आहेत. यामुळे विधानसभेला राहुल कुल हे भाजपच्याच चिन्हावर लढतील असा अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे रासपही याला फारकत घेणार नसून दौंड घ्या आणि बारामती द्या, अशी भूमिका ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक लढविताना पक्षाने अधिकाधिक जागांवर उमेदवार उभे करावेत, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी आहे. याबाबत आढावा घेतला जात असून मतदार संघानिहाय घटक पक्षांशी चर्चा करण्यात आल्यानंतर निर्णय घेतले जातील.
– महादेव जानकर, रासप अध्यक्ष/ पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.