वल्लभनगर बसस्थानकातून सोडल्या 14 एसटी बस
पिंपरी – लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरात अडकलेल्या परप्रांतियांना त्यांच्या मूळगावी सोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोमवारी एक हजार 207 मजूर उत्तराखंड येथे रेल्वेने रवाना झाले. त्यापाठोपाठ वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 325 परप्रांतीय मजुरांना एसटीने कर्नाटकला पाठवण्यात आले.
लाखो कामगार पोटापाण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत. हिंजवडी येथील आयटी पार्कमुळे आसपासच्या परिसराचाही झपाट्याने विकास झाला आहे. विविध ठिकाणी गृहप्रकल्पाचे काम सुरू असून त्याठिकाणी असणारे बहुतांश मजूर हे परप्रांतीय आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम मिळणे बंद झाले. अनेक संघटना व संस्थासह पोलिसांनी देखील या मजुरांना मदतीचा हात दिला. मात्र लॉकडाऊन वाढल्याने त्यांनी आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या, अशी मागणी मजूर वर्गाकडून केली जात आहे. त्यानुसार त्यांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्याचे काम केले जात आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात कर्नाटक येथील मजुरांना सोडण्याचे नियोजन केले. एका बसमधून सरासरी 22 प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली आहे. सोमवारी पिंपरी येथील वल्लभनगर बसस्थानकातून 14 बस रवाना करण्यात आल्या. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या व्यवस्थापक पल्लवी पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
शासन निर्देशानुसार एसटी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 26 बसचे नियोजन केले आहे. त्यातील 14 बस वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परप्रांतीय मजुरांसाठी सोडण्यात आल्या आहेत.
– पल्लवी पाटील, व्यवस्थापक, वल्लभनगर आगार
पहिल्या टप्प्यात कर्नाटक येथे 14 बस रवाना करण्यात आल्या आहेत. परप्रांतीय मजुरांसाठी या बस मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्याच्या सीमेवर या मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे त्यांनाच त्या राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे.
– डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक