क्रिकेट काॅर्नर | संपूर्ण ग्राउंड आच्छादित करा

-अमित डोंगरे

इंग्लंडमध्ये कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा सामना का या काळात आयोजित केला गेला, या प्रश्‍नाचे कवित्व अद्याप कायम आहे. मात्र, त्याचवेळी आणखी एक प्रश्‍न चाहत्यांच्या, खेळाडूंच्या मनात घोंगावत आहे. जर इंग्लंडमधील प्रत्येक मैदानावरील ड्रेनेज यंत्रणा अत्यंत सक्षम आहे तर मग सुपर सॉपरने अनेक तास पाणी घालवत बसण्यापेक्षा संपूर्ण ग्राउंड (प्लेइंग एरिया) कव्हर्स टाकून आच्छादित का केला जात नाही.

जागतिक क्रिकेटची मक्‍तेदारी असलेल्या आयसीसीची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी स्पर्धा असताना आणि त्याचा अंतिम सामना खेळवला जात असताना संपूर्ण ग्राउंड कव्हर केले जाईल इतके मोठे कव्हर्स उपलब्ध करणे सहज शक्‍य आहे. त्यासाठी जरी लाखो रुपयांचा खर्च आला तरी आयसीसी तो करु शकते. मग जर खेळाला महत्त्व आहे तर या बाकी सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या पाहिजेत. जगातील ज्या ज्या देशांत क्रिकेट खेळले जाते तिथे अशा सुविधा जर निर्माण केल्या गेल्या तर कोणत्याही सामन्यात असा वेळ वाया जाणार नाही व सामन्याचा निकाल लागेल. मुळातच टी-20 क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेटला घरघर लागली आहे. कसोटी हा क्रिकेटचा गाभा आहे वगैरे गोष्टी एका केवळ पुस्तकातच वाचण्यासाठी उरल्या आहेत.

कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे त्यामुळे या सामन्याचा निकाल लागलाच पाहिजे, अशा धारणेने विचार केला तरच यातून योग्य मार्ग निघेल. बीसीसीआय व न्यूझीलंड क्रिकेट मंडळ यांनीही पुढाकार घेतला असता तरी हे शक्‍य झाले असते. जागतिक क्रिकेटची सर्वेसर्वा आयसीसी असली तरीही ती बीसीसीआयपेक्षा श्रीमंत नाही. आपला संघ खेळत नाही म्हणून इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळानेही कोत्या मनोवृत्तीचे दर्शन तर घडवलेलेच आहे. निदान आयसीसीने संपूर्ण ग्राउंड आच्छादित होईल अशी कव्हर्स उपलब्ध केली असती तर हा सामना संपूर्ण पाचही दिवस एकदाही व्यत्यय न येता खेळवला गेला असता किंवा जरी पावसाचा व्यत्यय आला असता तरीही कव्हर्स टाकून ग्राउंड सुरक्षित व पाऊस थांबल्यावर लगेच सामना सुरू करण्यासाठी सुसज्ज बनले असते.

पाच दिवसांच्या या सामन्यात निकाल हाती यावा याकरता आयसीसीने सहावा दिवस राखीव ठेवला हे चांगले केले. मात्र, पहिला दिवस पावसाने वाया गेला त्यानंतर चौथा दिवस पावसाने वाया गेला म्हटल्यावर आता उर्वरित दोन दिवसांत दोन्ही संघांचे दोन डाव होऊन सामन्याचा निकाल लागणे शक्‍यच नाही. साउदम्पटनच्या मैदानाची सीमारेषा मोजली तर ती साधारणपणे 63 ते 75 इतक्‍याच अंतराची आहे. मग ती देखील सव्हर केली जाईल असे आच्छादन लावणे फार जिकिरीचे नाही. जर सुपर सॉपर यंत्राने मैदानातील साचलेले पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास इतका मोठा कालावधी लागतो तर संपूर्ण कव्हर्समुळे या यंत्राचीच गरज उरणार नाही.

चौथ्या दिवसाच्या खेळावर पावसाचे पाणी पडले व दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. यावेळी खरेतर उपहाराच्या वेळी पाऊस थांबलाही होता. मात्र, मैदानावर इतके पाणी साचले होते की ते काढून खेळ सुरू होणे हाती असलेल्या वेळेत शक्‍यच नव्हते. अशा अवस्थेला जागतिक कीर्तीच्या व गर्भश्रीमंत देशांच्या क्रिकेट मंडळांना सामोरे जावे लागते यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असावी.

हा सामना तर अनिर्णित राहणार हे जवळपास निश्‍चितच आहे, त्यामुळे आता काही करण्याची वेळही गेली आहे. मात्र, यातूनच बोध घेत आयसीसीने तसेच संलग्न देशांच्या क्रिकेट मंडळांनी आपल्या सामन्यांचे आयोजन ज्या मैदानांवर केले आहे तिथे संपूर्ण ग्राउंड कव्हर करता येइल असे आच्छादन व अत्यंत योग्य पद्धतीची ड्रेनेज यंत्रणा उभी करावी. जेणेकरून सामन्यात खेळाडूंचा खेळ व्हावा पावसाचा नव्हे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.