इच्छुकांच्या भाऊगर्दीत कोणाची डाळ शिजणार?

इंदापूरचा आखाडा तापला : राष्ट्रवादीच्या उमेदवारीकडे लक्ष

इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इच्छुकांची यादी मोठी झाल्याने पक्षश्रेठींना उमेदवारीचा गुंता सोडवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आमदार दत्तात्रय भरणे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यामध्ये जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पक्षात मोठी धुसपूस सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

भरणे यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, अशी भूमिका घेतली आहे. तरी भरणे यांनी विधानसभेची जय्यत तयारी केली आहे. यामध्ये भरणे दावेदार असल्याने आप्पासाहेब जगदाळे यांना शांत करण्यासाठी त्यांना जिल्हा बॅंकेची लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. दौंडमधून रमेश थोरात यांना विधानसभेची उमेदवारी देणार असल्याने जिल्हा बॅंकेचे पद रिक्‍त झाल्यास त्याजागी जगदाळे यांना संधी देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. जगदाळे गेली अनेक वर्ष जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून काम करीत आहेत.

इंदापूर तालुक्‍यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी एकत्र काम केल्याने विधानसभा काबीज करता आली होती. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची 20 वर्षांची सत्ता पालटवण्यात राष्ट्रवादीला यश आले. यावेळी देखील सर्वांनी एकत्र काम केल्यास पुन्हा इंदापूर तालुक्‍यात सत्ता आणणे शक्‍य होणार आहे. मात्र, भरणे यांच्या उमेदवारीला वाढता विरोध लक्षात घेता भाजपात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा सोपी जाणार काय, याची चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

इंदापूर तालुक्‍यातील जनमताचा बिघडत चाललेला कौल विचारात घेऊन शरद पवार यांनी इंदापूर जागेबाबत गुंता लवकरच सोडविल्यास लढत चुरशीची होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.