बलिया – उत्तरप्रदेशातील पोलिस दलातील कर्मचारीच दारूचा चोरटा व्यापार करणाऱ्यांना साथ देत असल्याची बाब उघड झाली आहे. बलिया शहरातून मोठ्या प्रमाणात दारू वाहतुक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले.
तसेच बलिया शहराजवळील हलदी भागातही या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांना या व्यवसायात काहीं पोलिस कर्मचारीच मदत करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन उपनिरीक्षकांसह एकूण पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
शेजारच्या बिहार राज्यात दारूबंदी आहे. तेथे उत्तरप्रदेशातून दारू चोरट्या मार्गाने नेण्यात येते. त्याकामी या पोलिसांची मदत होत होती. दारूच्या चोरट्या व्यापाराला साथ देणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.