केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणाचा तपास NIAकडे; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…

नवी दिल्ली – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाने तो आदेश दिला.

अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारीला संशयास्पद स्कॉर्पिओ जीप आढळली. त्या जीपमध्ये स्फोट घडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. स्फोटके ठेवण्यात आलेले वाहन मनसुख हिरेन यांचे असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर मागील आठवड्यात हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत आढळला. त्यामुळे संबंधित प्रकरणाची गुंतागुंत आणखीच वाढली. 

महाराष्ट्र सरकारने त्या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवला. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने हिरेन मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. अशातच केंद्रीय गृह मंत्रालयाने स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला. त्या घडामोडीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, एनआयएकडे तपास सोपवण्यात आल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. संबंधित प्रकरणाचा तपास आम्ही एटीएसकडे दिला आहे. त्याव्यतिरिक्त तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर काहीतरी काळंबेरं आहे. 

एटीएसचा तपास चालूच राहील. राज्याच्या यंत्रणांवर विरोधकांचा (भाजप) विश्‍वास असल्याचे दिसत नाही. विरोधक महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करत आहेत. सरकारे येतील आणि जातील. मात्र, सरकारी यंत्रणा त्याच राहतील. त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्याची गरज आहे, असे ठाकरे मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.