लंडन- जोपर्यंत कोविड-19 वरील एखादी लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्या लसीची शिफारस केली जाणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍदनोम घेब्रेयेसिस यांनी म्हटले आहे.
मोठा व्यापक संशोधन संपण्यापूर्वीच आणि अन्य देशांच्या संशोधनाच्या प्रक्रियेला अधिकृत मान्यता मिळण्यापूर्वीच रशिया आणि चीननेही लसीच्या चाचण्या करायला सुरुवात केली आहे. लस गेल्या दशकांपासून वापरात आहेत. या लसींच्या वापरामुळे देवीसारख्या रोगाचे उच्चाटन झाले आहे. तसेच पोलीओलाही नियंत्रणात आणले आहे, असे ते म्हणाले.
जोपर्यंत लस परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचे निश्चित होत नाही, तोपर्यंत जागतिक आरोग्य संघटना त्या लसीची शिफारस करणार नाही. नव्याने विकसित केले गेलेल्या इबोलावरील लसीमुळे कॉंगोमधील इबोलाची साथ आटोक्यात आणली आहे. लसीकरणाला होणाऱ्या विरोधामुळे नगरिकांनी गैरसमजूत करून घेऊ नये. विशेषतः पालकांनी दिशाभूल करून घेऊ नये.
लसीकरणामुळे 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. लसीकरणाला विरोध करणाऱ्या लोकांनी स्वतःचे संशोधन करून दाखवावे, असे आवाहनही घेब्रेयसिस यांनी केले.
परिणामकारक लस सापडल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र त्या लसीच्या केवळ काही डझन लोकांवर चाचणी घेतली गेली आहे. त्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याची परिणामकारकता सिद्ध व्हायची आहे. त्याची चाचणी आता 40 हजार लोकांवर घेतली जात आहे. चीनमध्येही संशोधन सुरू असून त्या लसीच्या व्यापक चाचण्या घेतल्या जात आहेत.
जुलैमध्ये आपण लस घेतली असल्याचे चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रातील प्रमुखांनी जाहीर केले. परंतु क्लिनिकल चाचणीचा भाग म्हणून ही लस घेत्तली गेली की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.