बिबवेवाडी (हर्षद कटारिया) –तळजाई येथील रामदेवबाबा क्रीडा संकुलाचा गैरवापर होत असल्याचे प्रकरण “प्रभात’ने समोर आणल्यानंतर आता सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील गैरबाबी समोर आल्या आहेत.
एका ठेकेदाराची मुदत तीन वर्षांपूर्वीच संपलेली असताना सध्या या संकुलाचा ताबा कोणाकडे आहे, याबाबत पालिका प्रशासनाकडेच माहिती नाही. त्यामुळेच पुणे शहर, उपनगरांतील सर्व क्रीडा संकुलाच्या कामासह सध्य स्थितीच्या वापराबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महानगपालिका आयुक्त देणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पुणे शहर तसेच उपनगरांतील महापालिकेच्या क्रीडा संकुलांचा ताबा नक्की कोणाकडे आहे? या जागांच्या वापरासाठी नागरिकांकडून मासिक शुल्क आकारले जात असेल तर ती रक्कम कोणाच्या खिशात जाते? क्रीडा संकुल भाडे करारावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असताना वर्षांनुवर्षे त्याच लोकांकडे कामे कशी जातात? संबंधित संकुलात होणाऱ्या गैरप्रकारांस नक्की कोण जबाबदार आहे, या सर्व बाबींची चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहितीसाठी पुणे महापालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त रंजना घगे यांना वारंवार फोन व मेसेज करूनही त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळेच संबंधित अहवालाबाबत प्रशासकीय पातळीवर अतिशय गुप्तता पाळली जात असल्याचेच यातून स्पष्ट होते.
भाजपाची सत्ता 2017 नंतर आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. संबंधित ठेकेदाराने भरलेली निविदा स्थायी समिती व मुख्य सभेने भाजप पक्षाच्या बहुमताच्या जोरावर फेटाळण्यात आली. त्यामुळे गेली तीन वर्षे पुणे मनपाला यातून कोणतेही उत्पन्न मिळालेले नाही. महापालिकेने आता तरी त्याची योग्य ते प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना अल्पदरात तेथील सुविधा उपलब्ध करून द्यावी.
– नितीन कदम, अध्यक्ष, पर्वती मतदार संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल गणेश गांधी नामक ठेकेदारास चालविण्यास दिले होते, त्याबाबत मला पुढील माहिती नाही.
– महेश वाबळे, नगरसेवक भाजप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव माझ्याकडे दि. 24/11/17 ते दि. 24/10/18 कालावधीमध्ये भाडेतत्वावर चालवण्यास दिला होता. मी पालिकेकडे तसा करारनामा करून 11 महिन्यांचे भाडे पूर्ण भरले आहे. याबाबतची सर्व कागदपत्रेही माझ्याकडे आहेत. पालिकेने नवीन टेंडर प्रक्रिया राबवून त्यास आयुक्तांची मान्यता घेतली होती, त्यानंतर आज तीन वर्षांपर्यंत ते पूर्ण क्रीडासंकुल कोण चालवत आहे, कोणाचा ताबा आहे हे पालिका प्रशासनालाच माहीत. प्रशासनाने चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा. – गणेश गांधी, ठेकेदार