विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपी आयुष अमृत कणसे (वय- २१, रा. भरतगाव वाडी, ता. सातारा) तसेच सतरा वर्षीय विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील यांचे इन्स्टाग्राम वर बनावट अकाउंट तयार करून त्यांचा अश्लील व्हिडिओ वायरल केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशन येथे २५ फेब्रुवारी २०२३ रोजी विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक( गुन्हे )संगीता माळी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला.
या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा सहभाग लक्षात आल्यावर त्यांना बुधवारी (दि.०३) सकाळी ताब्यात घेतले आहे. या गंभीर गुन्ह्यातील अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक(गुन्हे) संगीता माळी, सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शेवाळे, पोलीस हवालदार किरण खुडे, पोलीस नाईक रेहान पठाण, अंकुश जोगदंड, दादासाहेब बर्डे, महिला पोलीस शिपाई आस्मा शेख,रेणुका भोगावडे,प्रियंका शिंदे यांच्या पथकाने या गंभीर गुन्ह्याचा तपास केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता माळी करीत आहेत.