उद्या दुपारपर्यंत नाव जाहीर करण्याचे केजरीवालांचे आव्हान
नवी दिल्ली – एरवी कॉंग्रेस व अन्य विरोधकांना तुमचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान कोण हे जाहीर करा असे नेहमी आव्हान देणाऱ्या भाजपला आम आदमी पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांनी आता तुम्ही तुमचा दिल्लीतील मुख्यमंत्री कोण हे जाहीर करा असे आव्हान देत त्यांना चांगलेच कात्रीत पकडले आहे.
भाजपने दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यांच्याकडे तसा चेहराही नाही. त्यामुळे त्यांची ही कमुवत बाजू लक्षात घेऊन केजरीवालांनी त्यांना हे आव्हान देत त्यांना कोंडीत पकडले आहे. उद्या दुपारी एक वाजेपर्यंत तुमचा मुख्यमंत्री जाहीर करा अन्यथा आपण पुन्हा उद्या दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊ असे केजरीवालांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांचे नाव न जाहीर करता अमित शहा हे दिल्लीच्या नागरीकांकडून कोऱ्या चेक वर स्वाक्षरी मागत आहेत असा आरोप केजरीवालांनी आज पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री जाहीर करणार आहोत असे अमित शहा यांनी म्हटले आहे. तो धागा पकडून केजरीवाल म्हणाले की भाजपला मतदान करणाऱ्या नागरीकांना ते कोणाला मुख्यमंत्री करण्यासाठी मतदान करणार आहेत हे समजले पाहिजे. अमित शहा यांनी उद्या अशिक्षीत आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री दिला तर तो दिल्लीतील नागरीकांचा विश्वासघात ठरणार आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून मनोज तिवारी हे काम करीत आहेत पण त्यांची अपरिपक्वपणाबद्दल सोशल मिडीयातून वारंवार खिल्ली उडवण्यात आली आहे. दिल्लीत भाजपचे सात मुख्यमंत्री वेटिंग मध्ये आहेत अशी खिल्लीही आम आदमी पक्षाकडून उडवली जात आहे.